IND A vs AUS A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव! पाटीदारची अर्धशतकी झुंज व्यर्थ, ऋतुराज-सुदर्शनसह फ्लॉप
IND A vs AUS A : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने भारत 'अ' संघाला ६९ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

IND A vs AUS A 2nd ODI Spencer Johnson Ruturaj Gaikwad Series Defeat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत ‘अ’ (India A) संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया ‘अ’ कडून ६९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आणि अजिंक्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ४९.५ षटकांत २७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली आणि संपूर्ण संघ ४५.२ षटकांत अवघ्या २०६ धावांवर गारद झाला.
टॉप ऑर्डर पत्त्यांसारखा कोसळला; पाटीदारची झुंज ठरली व्यर्थ!
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. कर्णधार ऋतुराज गायकवाड, चांगल्या फॉर्ममध्ये असलेला साई सुदर्शन (१२) आणि देवदत्त पडिक्कल (१) स्वस्तात तंबूत परतले. मधल्या फळीत रजत पाटीदारने ८१ चेंडूंत ६७ धावा ठोकत एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ लाभली नाही. नवव्या क्रमांकावर अनुकूल रॉयने नाबाद ३४ धावा करत पराभवाचे अंतर केवळ कमी केले.
स्पेंसर जॉन्सनचा भेदक मारा; भारतीय फलंदाजांची दाणादाण!
Ind A lost the ODI series vs Aus A in India.
Glimpse of the condition of India’s ODI cricket after Rohit Kohli. https://t.co/T4tlxX1iFo
— Dinda Academy (@academy_dinda) October 9, 2026
धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतावर दबाव कायम ठेवला. डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेंसर जॉन्सनने (Spencer Johnson) अचूक मारा करत ८ षटकांत अवघ्या ३५ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स टिपले. त्याला रिले मेरेडिथ आणि तनवीर सांघा यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत उत्तम साथ दिली.
कॉन्स्टास आणि फिलिपची अर्धशतके; अरशद खानच्या ३ विकेट्स!
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘ए’च्या डावाला सॅम कॉन्स्टास (६७) आणि जोश फिलिप (५८) यांच्या अर्धशतकांनी भक्कम आकार दिला. भारताकडून मध्यमगती गोलंदाज अरशद खानने ३ तर यश ठाकूरने २ विकेट्स घेतल्या. मात्र, फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला सामना आणि मालिका दोन्ही गमवावे लागले.





