वाढत्या ड्रग्ज गुन्ह्यांना चाप बसणार.! मुख्यमंत्री फडणवीस घेणार मोठा निर्णय

मुंबई – अमली पदार्थ तस्करी आणि बाल गुन्हेगारी विरोधात सरकार कठोर पाऊले उचलत आहे. तसेच ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर त्रुटींचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वाढत्या प्रमाणात वापर होत आहे.
यामुळे कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना ड्रग्ज तस्करीत येण्यापासून रोखण्यासाठी अमलीपदार्थ तस्करी प्रकरणांमध्ये बाल गुन्हेगाराचे वय १६ पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले. यासंदर्भात विलास भुमरे यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अज्ञान बालकांना ड्रग्ज तस्करीसाठी वापरले जाते याबद्दल कबुली दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्ज पेडलिंगमध्ये सहभागी असलेल्या बालकांच्या वयोमर्यादेत बदल करता येईल का याबाबत विचार सुरू आहे. अज्ञान बालकांना पकडून त्यांच्या वतीने हे गुन्हे चालतात. त्यामुळे गुन्ह्याचे स्वरूप पाहून आवश्यक ते बदल केले जातील. मुंबईतील बेहरामपाडा भागात ड्रग्ज व्यावसायिक असतील तर धडक कारवाई केली जाईल.
नायजेरियन नागरिकांकडून होणार्या ड्रग्ज तस्करीविषयी उत्तर देताना ते म्हणाले, विदेशी नागरिकांना पकडल्यानंतर परत पाठवले जाते (डी-पोर्ट); पण येथेच राहण्यासाठी ते पुन्हा गुन्हा करतात. याविषयी केंद्र सरकारसमवेतही चर्चा चालू आहे. जिथे वारंवार अमलीपदार्थ विषयक गुन्हे घडतात, तिथे मकोकासारखी कठोर कारवाई करण्याचा विचार करु. गेल्या सप्ताहात सभागृहाने एनडीपीएस कायद्यात सुधारणा करण्यासाठी मान्यता दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे सर्व पोलीस ठाण्यात ‘अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड’ची स्थापना केली आहे. तसेच शाळा संपर्क अभियानांतर्गत शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. सरकारने कठोर कारवाई चालू केल्यामुळे एनडीपीएस अंतर्गत प्रविष्ट गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अधिक लक्ष देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.





