पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांत वाढ

लोणावळा- पुणे-लोणावळादरम्यान 2 मार्चपासून दोन लोकलची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने मिळून लोकलच्या 20 फेऱ्या होणार आहेत. मागील आठवड्यात रेल्वे प्रशासनाने तीन लोकल नव्याने कार्यान्वित करण्याचे जाहीर केले होते. यापैकी दोन लोकल 2 मार्चपासून सुरू होणार आहेत.
नव्याने सुरू होणारी पहिली लोकल पुण्याहून सकाळी 5.45 वाजता सुटेल. ती सकाळी 7.05 वाजता लोणावळा स्थानकात पोहोचेल. लोणावळ्याहून 7.25 वाजता लोकल सुटेल. ती पुण्यात 8.48 वाजता दाखल होईल. दुसरी लोकल पुण्यावरून सकाळी 9.55 वाजता सोडण्यात येईल. ती लोणावळ्यात 11.15 वाजता दाखल होईल. लोणावळ्याहून दुपारी 2.50 वाजता लोकल धावेल. ती पुण्यात दुपारी 4.10 वाजता पोहोचेल. लसीकरण पूर्ण झालेले आणि युनिव्हर्सल पास असणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना त्यांचे वयाचे प्रमाणपत्र सादर केल्यास आणि वैद्यकीय कारणांमुळे लस न घेतलेल्यांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखविल्यास त्यांना मासिक पास उपलब्ध होईल.





