घरांच्या किमतींमध्ये वाढ; पोलाद, सिमेंटसह कच्चा माल महागल्याचा परिणाम

कोलकाता – घरासाठीच्या कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे पश्चिम बंगालमधील विकसकांनी घरांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यातील विकासकही घरांच्या किमती वाढविण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमधील क्रेडाई या विकसकाच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकीकडे मागणी वाढत असतानाच घराचा उत्पादनखर्च वाढत असल्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक दिसत नाही. अगोदरच घरांचे दर पाच टक्क्यांनी वाढविले असून 2022 मध्ये त्यामध्ये आणखी दहा टक्क्यांची वाढ होईल असे सांगण्यात आले. जास्त किमतीच्या घराबरोबरच किफायतशीर घराच्या दरातही वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांमध्ये घरांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. मात्र कच्च्या मालाच्या दरात दर वर्षाला किमान पाच टक्क्यांनी वाढ होत आहे. गेल्या वर्षीही बांधकामाचा खर्च 12 टक्क्यांनी वाढला तर मजुरीचा खर्च 20 टक्क्यानी वाढला आहे. दरम्यानच्या काळामध्ये इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे.
जर सरकारला घरांचे दर कमी पातळीवर ठेवायचे असतील तर सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आतापर्यंत व्याजदर कमी आणि घरांचे दर कमी असल्यामुळे घर घेणाऱ्यांना अतिशय पोषक परिस्थिती होती. मात्र आता घरांचे दर वाढू लागले आहेत. त्याचबरोबर व्याज दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. कालच कोटक महिंद्रा बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याज दरात वाढ जाहीर केली आहे.





