Prices hike: साबण-बिस्किटांपासून खाद्यतेलापर्यंत ‘या’ पदार्थांच्या किंमती वाढणार; पाहा यादी
Prices hike: कच्चा माल, पॅकेजिंग खर्च वाढल्याने एफएमसीजी कंपन्यांचा निर्णय; घरगुती बजेटवर ताण वाढण्याची शक्यता

Prices hike: साबण, बिस्किटे, खाद्यतेल, शॅम्पू यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू लवकरच महाग होण्याची शक्यता आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किमती, पॅकेजिंग खर्चातील वाढ आणि पश्चिम आशियातील तणावामुळे एफएमसीजी कंपन्यांवर खर्चाचा दबाव वाढला असून, डाबर इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), नेस्ले इंडिया, मॅरिको, ब्रिटानिया आणि आयटीसीसारख्या कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. (Prices hike)
डाबर इंडियाचे ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनी पुन्हा दरवाढ करू शकते. यापूर्वीच डाबरने सुमारे चार टक्के किंमतवाढ केली असली तरी कच्च्या मालाच्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने आणखी वाढ अपरिहार्य ठरत आहे.
चौथ्या तिमाहीत डाबरचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर १५.७५ टक्क्यांनी वाढला असला, तरी महागाईचा दबाव कायम असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम – (Prices hike)
इराण-अमेरिका संघर्ष आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीभोवती निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. हॉर्मुझ मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि वायू पुरवठा होतो. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्यांचा थेट परिणाम इंधन, वाहतूक आणि उत्पादन खर्चावर होत आहे.
कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे वाहतूक, प्लास्टिक पॅकेजिंग, रसायने आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढतो. त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून, त्याचा भार ग्राहकांवर टाकण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे.
खाद्यतेलांच्या किमतीत झपाट्याने वाढ –
गेल्या तीन महिन्यांत टोमॅटो, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि मोहरी तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलसह युरिया, अॅल्युमिनियम आणि खाद्यतेलांचे दरही झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. (Prices hike)
ग्रामीण बाजारात मागणी वाढली –
दरम्यान, ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा झाल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये विक्री वाढू लागली आहे. मात्र, मागणी वाढत असतानाच कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपन्यांच्या नफ्यावर दबाव निर्माण झाला आहे.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहिला आणि पश्चिम आशियातील तणाव कायम राहिला, तर आगामी महिन्यांत घरगुती खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.







