पुणे | फळभाज्यांच्या मागणीत वाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. २८) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ९० ते १०० ट्रक आवक झाली होती. बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी आवक वाढली आहे. मात्र, फळभाज्यांना मागणी वाढल्याने लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली असून, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर स्थिर होते.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून तोतापुरी कैरी प्रत्येकी १ हजार बॉक्स, कोबी प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ५ ते ६ ट्रक, कर्नाटक पावटा २ ते ३ टेम्पो आणि भुईमूग शेंगा बेळगाववरून २ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ५ ते ६ टेम्पो, राजस्थान गाजर २ ट्रक, तर मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ८ ते ९ टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो.मटार पारनेर येथून ५० ते ६० टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ८० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो आवक झाली होती.
कडक उन्हाळ्यामुळे पालेभाज्या महागल्या
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी असल्याने पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पालेभाज्यांची म्हणावी तेवढी आवक न झाल्याने बहुतांश सर्वच पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शेपू, कांदापात, चाकवत, करडई, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे, तर कोथींबीर, मेथी, पुदिनाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़ कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ७० हजार जुडींची आवक झाली होती.
आवक घटल्याने फळे महागली
मोसंबी, संत्री, कलिंगड, चिक्कूचे भाव वाढले
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात उन्हामुळे फळांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने रविवारी मोसंबी, संत्री, कलिंगड, चिक्कूच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर बहुतांश फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (दि. २८) मोसंबी ३० ते ४० टन, अननस ४ ट्रक, संत्रा ८ ते १० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबांची सुमारे ८०० ते १२०० गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिक्कू एक हजार बॉक्स इतकी आवक झाली होती, तर कोकणातील हापूस आंब्यांची सुमारे १५ हजार पेट्या, कर्नाटक येथून सुमारे २ ते ३ हजार पेटी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००- १८००, मोसंबी : (३ डझन): २२०- ४००, (४ डझन) : १२०- २००, संत्री : (१० किलो) : २५०- १६५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०- १४०, आरक्ता: १०- ४०,, गणेश : ५- २५, कलिंगड : १२- १४, खरबूज : १८- २५, पपई : ८- १५, चिक्कू (दहा किलो) : ५०- ४००, अननस (१ डझन) १००- ६००. रत्नागिरी हापूस (कच्चा) ४ ते ६ डझन १००० ते २२०० रुपए, ५ ते ८ डझन १२०० ते २५००, तर पिकलेला आंबा ४ ते ६ डझन – १५०० ते २५०० आणि ५ ते ८ डझन २००० ते २५०० रुपये.
सुट्ट्या फुलांच्या भाव घसरले
हनुमान जयंतीनंतर सुट्ट्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत सुट्ट्या फुलांची आवक जास्त असल्याने त्याच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. लग्नसराई सुरू झाल्याने शोभिवंत फुलांना मागणी कायम आहे. आवक- जावक कायम असल्याने शोभिवंत फुलांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.




