उत्पन्नवाढीसाठी मिळकतकर विभागाला “बळ”

पुणे – महापालिकेच्या मिळकतकराच्या थकबाकीसह नियमित कर वसुलीसाठी या विभागात काम केलेले मात्र सध्या इतर विभागांत कार्यरत असलेल्या 66 कर्मचाऱ्यांची पुन्हा तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत.
मिळकतकर विभागास आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तब्बल 71 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर, या विभागास 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 2,500 कोटींच्या महसूलाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी हे अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत.
महापालिकेकडे सध्या साडेअकरा लाख मिळकतींची नोंदणी असून समाविष्ट 23 गावांमध्ये 2 लाख मिळकतींची नोंदणी करणे, मिळकतकर वसूल करणे हे काम प्राधन्याने करावे लागत आहे. अनेक गावांमध्ये महापालिकेने कर्मचारी नियुक्त करून थेट कर वसुली सुरू केली आहे. यासह इतर योजनांद्वारे थकीत मिळकतर वसूल करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असल्याने इतर विभागांतील वरिष्ठ लिपीक व लिपीक टंकलेखक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे मनुष्यबळ पाणी पुरवठा, विविध क्षेत्रीय कार्यालय, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, मुख्यलेखा व वित्त विभाग, परिमंडळ कार्यालय 1 ते 5 यासह इतर विभागांतील 18 वरिष्ठ लिपीक व 48 लिपीक टंकलेखक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





