भाजप प्रवक्त्यांच्या यादीत उज्ज्वल निकम यांच्या नावाचा समावेश; सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप

Ujjwal Nikam Vs Sushma Andhare | भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्याअनुषंगाने आता भाजपने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“भाजपचे प्रवक्ते कायमचे चिथावणीखोर वक्तव्य करुन समाज विघटीत कसा होईल, यासाठी प्रयत्न करत राहतात. परंतु, कदाचित नितेश राणे, निलेश राणे, चित्रा वाघ, राणा दाम्पत्य या सर्वांच्या कर्णकर्कशओरडण्यामुळे समाजात काही प्रभाव पडेना किंवा लोक त्यांना गांभीर्याने घेत नाही. याची खात्री भाजपला पटली आहे. त्यामुळे जात आणि धर्माचे नावाने द्वेषपूर्ण वक्तव्य करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचं नावं अधिकृत लेटरवर आहे.
हे फार विशेष आहे. आता सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली व्यक्ती भाजपचा अधिकृत प्रवक्ता म्हणून बोलणारा असेल, तर हे धक्कादायक आहे. न्यायव्यवस्थेतील हे पहिलं उदाहरण असेल की एखादी व्यक्ती सरकारी वकिल असताना त्याचवेळी राजकीय पक्षाच्या लेटरवर आहे. हे लोक अशा कृतीतून कायदा मोडत आहेत,” असे सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे.
कदाचित नितेश-निलेश राणे, चित्रा वाघ राणा ही मंडळी कर्णकर्कश ओरडतात मात्र यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झालेय. याची खात्री भाजपाला सुद्धा पटलीय म्हणूनच आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी या लोकांना दिली आहे.
यात सरकारी वकील निकम सुद्धा अधिकृतरित्य आहेत…!@PTI_News pic.twitter.com/AEXn9Y3L6y— SushmaTai Andhare (@andharesushama) July 19, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. परंतु यात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. निवडणूक लढवण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा सरकारी वकिल पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीत उज्ज्वल निकम यांच्या नावाचा समावेश केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
जम्मूमध्ये आता दहशतवादी सुरक्षित नाहीत, लष्कराने वाढवली जवानांची संख्या, कमांडोही झाले दाखल’





