Pune District : कुरकुंभमध्ये व्ह्यू ग्लास फुटल्याची घटना भोवली
Pune District : (दि.२६) नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कारखान्यात एन-ब्युटानॉल डिस्टिलेशन प्रक्रिया सुरू असताना तापमान आणि दाब वाढल्याने रिॲक्टरला जोडलेला व्ह्यू ग्लास फुटला होता. घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र, रासायनिक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

कुरकुंभ : कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील स्फोटसदृश घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एन-ब्युटानॉल डिस्टिलेशनदरम्यान रिॲक्टरला जोडलेला व्ह्यू ग्लास फुटल्याच्या घटनेची दखल घेत कंपनीतील सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणेतील संभाव्य त्रुटी दूर करून आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश व्यवस्थापनाला दिल्याने संबंधित प्रक्रिया सध्या थांबवावी लागणार आहे.
(दि.२६) नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कारखान्यात एन-ब्युटानॉल डिस्टिलेशन प्रक्रिया सुरू असताना तापमान आणि दाब वाढल्याने रिॲक्टरला जोडलेला व्ह्यू ग्लास फुटला होता. घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र, रासायनिक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
घटनेची माहिती कारखान्याच्या भोगवटादाराने विहित कालमर्यादेत व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे विभाग-१ यांना कळविली नसल्याचे संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांद्वारे घटनेची माहिती मिळताच विभागाने कारखान्याची आपत्कालीन तपासणी केली.
सहसंचालक सुधीर शिंदे आणि सहायक संचालक विष्णू सांगोलकर यांनी (दि.२७) व (दि.२८) रोजी कारखान्याची पाहणी केली. तपासणीच्या अनुषंगाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाजाच्या अटी संहिता, २०२० मधील कलम ३८(१-अ)(अ) अंतर्गत सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. त्रिमूर्ती फार्मातील घटनेनंतर दोन दिवसांच्या तपासणीअंती जारी झालेल्या आदेशांमुळे कारखान्यातील संबंधित प्रक्रिया थांबली आहे. आता सुरक्षा उपायांची पूर्तता आणि संभाव्य धोके दूर करण्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर आली आहे.
सुरक्षा उपकरणे बसविण्याचे निर्देश
कारखान्यातील रासायनिक प्रक्रियेची सुरक्षितता वाढविण्यासाठी संचालनालयाने व्यवस्थापनाला विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रिॲक्टरला सेफ्टी व्हॉल्व्ह आणि रप्चर डिस्क बसविणे, रिॲक्टर, प्रेशर व्हेसलची हायड्रॉलिक टेस्टिंग करणे, तज्ज्ञांमार्फत HAZOP अभ्यास करून त्यातील शिफारशींची अंमलबजावणी करणे, अशा बाबींचा त्यात समावेश आहे. अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दूर करून ती अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सुरक्षा उपायांची पूर्तता आणि आवश्यक निकषांचे पालन झाल्याशिवाय सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया सुरू ठेवता येणार नाही.





