पुणे जिल्हा | एमआरपी किमतीला दुकानदारांच्या वाटाण्याच्या अक्षता

सोरतापवाडी, (वार्ताहर) – कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन अशा अनेक गावांत दूध विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांकडून ग्राहकांची लूट होत असून याला वाली आहे का कोण, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.
सरकारने ठरवून दिलेल्या एमआरपी दराच्या किमतीपेक्षा किराणा दुकानदार, मिठाई दुकानदार व हाँटेल व्यवसायिक जास्त पैसे घेत असून एमआरपी किमतीला अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित अधिकारी डोळे मिटून गप्प आहेत. पूर्व हवेलीतील गावांमध्ये मिठाई दुकानदार व किराणा दुकानदार यांच्याकडून दूध पिशव्यांची विक्री करताना एमआरपी किमतीच्या एक ते तीन रुपये जास्त घेताना आढळून आले आहे.
गायीच्या दुधाच्या पिशवीची किंमत 56 रुपये लिटर असताना दूध विक्रेते 58रुपये घेतात. तर म्हशीच्या दुधाची किंमत 72 रुपये असताना काही किराणा दुकानदार व मिठाईचे दुकानदार 74 रुपये घेत आहेत. हॉटेल व्यवसायिक पाण्याच्या वाटलीची किंमत त्यांच्या मर्जीप्रमाणे घेत घेत आहेत. तसेच काही बाटल्यांवर कसल्याही प्रकारची किंमत नसल्याने ग्राहकांना आश्चर्य वाटत आहे.
याबाबत लोणी काळभोर येथे एका ग्राहकाने किराणा दुकानातुन गाईचे सील बंद दुधाच्या अर्धा लिटरच्या दोन पिशव्या म्हणजे एक लिटर दुध आणले असता दुकानदाराने त्यांच्याकडून 58रुपये घेतले. त्यावर 28 रुपये अर्धा लिटर असे असताना त्या दुकानदाराने ग्राहकाकडून 58रुपये घेतले असून सर्व करांसहित 56 रुपये घेणे बंधनकारक आहे.
तसेच नायगाव फाटा येथील म्हातोबाची आळंदी रस्त्यावर असलेल्या मिठाई दुकानदाराने म्हशीच्या दुधाची एक लिटर पिशवी एमआरपी 72 रुपये असताना 73 रुपये घेतले. त्या पिशवीवर सर्व करांसहीत एमआरपी असे लिहिले आहे.
ग्राहकांने विचारणा केली असता दुध विक्री म्हणजे नुसती हमाली असल्याचे मिठाई दुकानदाराने सांगितले. मग ग्राहकांना प्रश्न पडतो की, ही हमाली शंभर ते दोनशे लिटर दुध विक्री करुन का बरं दुकानदार करतात. त्यामुळे त्यांना कमिशन सोडून चारशे ते पाचशे रुपये नफा मिळत असुन शेतकर्यांना सुध्दा एवढा नफा अतिरिक्त मिळत नाही.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कुठलीही वस्तू एमआरपीपेक्षा एक रुपया सुद्धा जास्त किंमत घेता येत नाही. त्यामध्ये लाईट, कूलिंग चार्ज सुद्धा जास्त घेता येत नाही. तरी ग्राहकांनी असे आढळल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. -संदीप शिवरकर, तालुकाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत





