Pune District : इच्छुकांची दीपोत्सवात ‘मतपेरणी’; पूर्व हवेलीत निवडणुकीपूर्वी संवाद, भेटीचा सोहळा रंगला

सोरतापवाडी : पूर्व हवेलीतील काही गावात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य होण्याची स्वप्न पाहणारे व ती सत्यात आणण्यासाठी अंगात सध्या जोरदार वारे वाहत आहे. मतदान प्रक्रियेतील गट व गणाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावरून प्रचार सुरु करून दिवाळीनिमित्ताने पूर्व हवेलीत गाव भेट दौरे सुरू केले.
जनसंपर्क वाढवून नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवनवीन गिफ्ट, मिठाई, फराळ, महिलांसाठी साड्यांचेही वाटप सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. यातून उमेदवार आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक पडघम वाजू लागल्याने सर्वत्र राजकीय वर्दळीचे चित्र दिसून येत आहे. त्यातच दिवाळीसारखा सण यामुळे या निवडणुकीला इच्छुक उमेदवारांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मीच कसा उमेदवारीसाठी श्रेष्ठ यासाठी नेत्यांची लगबग चालू आहे.
मतदारांना प्रभावित करण्याच्या नानाविविध कल्पना विशेष करून प्रलोभनांचा अवलंब करण्यात येत आहे. नुकत्याच या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये गट नंबर ३८ कोरेगावमूळ, गट नंबर ३९ उरळीकांचन, गट नंबर ४० थेऊर, गट नंबर ४१, लोणी काळभोर हे गट पूर्व हवेलीत येत आहे. हवेली पंचायत समितीमध्ये कोरेगाव मूळ, केसनंद, उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, आव्हाळवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती हे गण येतात.
जिल्हा परिषद गटामध्ये व गणामध्ये असलेल्या नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवनवीन गिफ्टस, मिठाई, महिलांसाठी साड्यांचेही वाटप करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही उमेदवार मतदारांना देवदर्शन करुन आणणार आहेत. यातून उमेदवार आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू निवडणूक आयोगाच्या खर्चाबाबत नियम व अटी यानुसार जर चौकशीचा सासेमेरा मागे लागला तर तो मी नव्हेच या भूमिकेत हे सारे वाटणारे आहेत. बिनदिक्कतपणे मतदारांना विविध प्रकारच्या वस्तूंचे वाटप चालू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. निवडणुकांच्या तारखा आणखी जाहीर झालेल्या नसल्या तरीही आपणच निवडणुकीत उमेदवार असल्याचे जाहीर करून प्रत्येक गावातील वाड्यावस्तीवर जाऊन गाठीभेटी घेत आपल्याला या निवडणुकीत संधी द्यावी, अशी विनंती केली जात आहे.
गोडधोड उत्सवाचा राजकीय मिलाफ
अलीकडे निवडणुकीचे स्वरूपच बदलत जात आहे. कारण मतदारांना गृहीत धरून या निवडणुकीत अनेक प्रलोभने मतदारांना दाखविली जात आहेत. यामध्ये सणासुदीच्या दिवसात लागणाऱ्या मिठाई वाटपापासून ते लाडक्या बहिणींना दिवाळी भेट अर्थात भाऊबीज म्हणून साड्यांचे वाटप चालू आहे. जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कधी पण काय पण करण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी सुरु केली असून अजूनही काही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी गुलदस्त्यातच ठेवली आहे. गावोगावी लागलेले दर्शन यात्रेचे फ्लेक्समुळे सध्या तरी या गावांतील चित्र बदलले आहे. नागरिक मात्र संभ्रमावस्थेत असून प्रमुख पक्ष्यांची उमेदवारी कोणाला मिळणार हे जाहीर झालेले नसतानाही पूर्व हवेलीतील गटात व गणात मात्र मतदारांची दिवाळी गोड होत आहे.





