Pune District : सोरतापवाडी गणातील निवडणूक रंगतदार

सोरतापवाडी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2025 च्या शेवटी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गणात मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
या गणात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात होण्याची शक्यता आहे. मात्र युती झाल्यास तिकीट कुणाला मिळणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवार सुदर्शन चौधरी यांनी सरपंचपदाच्या काळात दिवंगत खासदार गिरीश बापट आणि दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून गावात भरघोस निधी आणून विकासकामे केली. पुजा सणस या महिला बचत गटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या असून लाडकी बहीण योजनेसह अनेक शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यात पुढाकार घेत आहेत.
तसेच गरजू रुग्णांना हॉस्पिटल बिलात मदत करण्यासाठीही त्या ओळखल्या जातात. अण्णा महाडिक हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक व युवकांसाठीचे उपक्रम राबवत आहेत. निखिल कांचन हे उरुळी कांचनमधील लोकप्रिय युवा चेहरा असून त्यांनी अनेक विकासकामे स्वतःच्या खर्चाने पूर्ण केली आहेत. परिसरातील तरुणांची मोठी साथ ही त्यांची जमेची बाजू आहे. काका कुंजीर हे वळती परिसरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते असून अजित पवार गटातील महत्त्वाचे दावेदार ठरत आहेत.
सध्या सर्वच पक्षांमध्ये तिकीटांसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रत्येक दावेदार पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अखेरीस कोणाच्या गळ्यात तिकीटाची माळ पडते, याकडे पुर्व हवेलीचा सगळ्या मतदारांचा कल लागला आहे. सोरतापवाडी गणाची निवडणूक यंदा चुरशीची आणि अत्यंत रंगतदार ठरणार हे निश्चित!
भाजपकडून दोन तर राष्ट्रवादीकडून चार दावेदार
सोरतापवाडी गणात भाजप तर्फे सुदर्शन चौधरी (माजी सरपंच, सोरतापवाडी), पुजा सणसया दोघांनी तिकीटासाठी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अण्णा महाडिक (माजी सरपंच, शिंदवणे व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), काका कुंजीर (वळती- सक्रीय सामाजिक कार्यकर्ते). राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे निखिल कांचन (उरुळी कांचनचे युवा कार्यकर्ते) हे तिकीटाचे प्रमुख दावेदार आहेत.
कोणत्या गावाचे मतदान ठरणार निर्णायक?
या गणात सोरतापवाडी, उरुळी कांचनचा वार्ड क्रमांक 1, शिंदवणे, तरडे, वळती ही गावे येतात. सोरतापवाडी व उरुळी कांचनमधील मतदान सर्वाधिक आणि प्रभावी मानले जात असून येथील मतांचा कल विजयाची दिशा ठरवू शकतो. तर तरडे, वळती आणि शिंदवणे येथील मिळणारा पाठिंबा उमेदवारांच्या विजयाचा पाया भक्कम करू शकतो.





