Pune District: जलजीवनचे कोट्यवधी रुपयांचे पाईप धूळखात

सोरतापवाडी : केंद्र सरकारने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी जलजीवन मिशन योजनेची अमंलबजावणी सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आहे. ज्यामुळे महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट कमी होऊन त्यांचा वेळ आणि श्रम वाचले आहेत. पूर्व हवेलीत सुद्धा अनेक गावात या मिशन योजनेअंतर्गत जलजीवनचे काम चालू झाले; परंतु याला गती कमी आल्यामुळे करोडो रुपयांचे पाइप अस्ताव्यस्त व धूळखात पडल्याचे दिसत आहे.
सोरतापवाडी, उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, आळंदी म्हातोबाची, कदमवाकवस्ती या गावातील जीवन मिशन योजना परवानगी मिळाल्यापासून कायम वादाच्या भोवर्यात आहेत.कधी जागेबद्दल वाद, तर कधी रस्त्याबद्दल तक्रारी येतच आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तोडल्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. तर काही ठिकाणी गावातील रस्ते उकरून ठेवल्यामुळे नागरिकांना त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. कोरेगाव मूळ व उरुळी कांचन येथील लाखो रुपयांचा मुरूम व माती परस्पर विकून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविल्याचा आरोप झाला.
कोरेगाव मुळ येथील पाणी पुरवठा योजना 88 कोटी 12 लाख 86 हजार रुपये, उरुळी कांचन येथील पाणी पुरवठा योजना जवळपास 90 कोटी, सोरतापवाडी येथील योजना 65 कोटी, कदमवाकवस्ती येथील योजना 89 कोटी 97 लाख रुपयांची. इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासकीय मान्यता देण्यात आली होती. पण प्रारंभ झाल्यापासून सतत नवीन नवीन वाद पुढे येत असुन सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात रस्त्यावरून वाद चालू झाला. विनापरवानगी अनधिकृतपणे रस्ता खोदून नुकसान केले. रस्ते पुन्हा दुरुस्त करून दिले नाही. याबाबत चौकशी करून ठेकेदारावर विनापरवानगी आणि अधिकृतपणे शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पूर्व हवेलीत या योजनेअंतर्गत येणारे कोट्यवधी रुपयांचे पाइप अस्ताव्यस्त पडले असून याला कोणी वाली नसल्यासारखेच झाले आहे. वरील गावातील योजना मध्यंतरी निधीअभावी बंद होत्या. पण आता त्या हळूहळू सुरु झाल्या आहेत. या मिशन अंतर्गत येणार्या योजना पूर्ण झाल्यावर केंद्र सरकारची एक चांगली योजना नागरिकांना पहावयास मिळेल व नागरिकांची पाण्याच्या त्रासापासून नक्कीच सुटका होईल.
सर्व ठेकेदारांना योजना ताबडतोब पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही परवानग्या रखडल्या होत्या. आता त्या बर्यापैकी मिळाल्या आहेत. तसेच निधीची कमतरता पण होती पण आता निधीचा प्रश्न सुद्धा सुटलेला असून साठवण तलावाचे काम जोरात चालू आहे. जून व जुलै महिन्यात वरील गावातील जलजीवन मिशनचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण होऊन पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. तसेच ठेवलेल्या पाईपामुळे नागरिकांना त्रास होणार नसल्याची काळजी ठेकेदारांना घेण्यास सांगितले आहे.
-इक्लास शेख, उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण





