कुस्त्या लावण्यावरून मारहाण
डिकसळ- निरगुडे (ता. इंदापूर) येथील यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या यात्रेत कुस्त्या लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यावेळी एकमेकांना शिवागाळ केल्याच्या कारणावरून भांडणाचे पर्यावसन लाठी काठी, दगडाने मारहाणीत झाले. याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये अशोक दिनकर लकडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडे गावच्या लिंबराज यात्रेनिमित्त शनिवारी (दि. 20) रोजी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले होते. कुस्ती लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण झाली. फिर्यादी लकडे आणि त्यांचे सहकारी निलेश मोतीलाल पवार हे डिझेल आणण्यासाठी पिंपळे येथे जात होते. त्यावेळी प्रशांत पानसरे, निलेश पानसरे, विकास पानसरे, सुशील पानसरे, सूरज केकान (सर्व रा. निरगुडे) यांनी फिर्यादी यांची मोटारसायकल अडवून यात्रेतील भांडणाच्या कारणावरून फिर्यादी लकडे यांना मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास मोरे करीत आहेत.