नागपूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष आज नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार केला. विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्त; भाजपच नंबर वन – यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात भाजपच नंबर एकचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, राज्यातील ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या ५० च्या विरोधात आमचे २१० नगराध्यक्ष निवडून आले असून, आम्ही विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्त केले आहेत.” विशेषतः नागपूर जिल्ह्यातील ‘सावनेर’ नगरपालिका काँग्रेसमुक्त करून विरोधकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याचे त्यांनी नमूद केले. नगरसेवकांच्या संख्येत विक्रमी वाढ- २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १,५०० नगरसेवक होते, मात्र यावेळी हा आकडा दुपटीने वाढून ३,००० च्या पार गेला आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. गेल्या ३० वर्षांतील हा एक विक्रम असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासनीतीवर जनतेने टाकलेला हा विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विजयाने मातणार नाही, माजणार नाही!- विजयाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “या विजयाचे खरे मानकरी तळागाळातील कार्यकर्ते आहेत. निवडणुकीतील विजय ही आपल्या कामाची पोचपावती आहे. मात्र, विजयाने मातणार नाही आणि माजणार नाही, हा आपला संकल्प असला पाहिजे.” आगामी महापालिका निवडणुकांमध्येही अशाच प्रकारचे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.