पुण्यात वाहतूक पोलिसांना हक्काचा ‘आडोसा’

पुणे, दि. 23 (अविनाश ढगे) -वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करता यावे, यासाठी महापालिकेकडून 100 बुथ देण्यात येणार आहेत. त्यातील 10 बुथ मंगळवारी शहरातील वेगवेगळ्या चौकात बसविण्यात आले असून, हे बुथ पदपथावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी हे बुथ लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणाहून वाहतूक नियमन सोडाच; पण महापालिकेने केलेल्या स्मार्ट पदपथांवर मात्र अडथळ्याची भर पडली आहे. हे पदपथ महापालिकेने दिले असले तरी त्याला अतिक्रमण विभागाची मान्यता घेण्यात आलेली नसल्याचेही समोर आले आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस चौका-चौकात उभे असतात. बऱ्याच वेळा त्यांना ऊन, वारा आणि पावसात उभे राहून नियमन करावे लागते. त्यांना यापासून सरंक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने चौका-चौकात बुथ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे बुथ शहरात पीएमपीच्या पास केंद्राप्रमाणे आहेत. हे बुथ पदपथावर लावले आहेत.
दरम्यान, हे बुथ पदपथावर बसविणे योग्य नाही. त्याबाबत अतिक्रमण विभागाची कोणतीही मान्यता घेण्यात आलेली नाही. तसेच जागांबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
महापालिकेकडून हे बुथ देण्यात आले असून, पालिकेकडून त्याच्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. सध्या 10 बूथ मिळाले असून, गणेशोत्सवानंतर आणखी 90 बुथ शहराच्या प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात येणार आहेत.
– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा





