Pune News : पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिल मेहेर यांच्या हस्ते देशमुख-जाधव यांचा सत्कार करण्यात आला. मेहेर यांनी देशाच्या शिक्षण विभागाचे बजेट वाढवण्याची गरज व्यक्त केली.

Pune News – कोणत्याही नैसर्गिक, सामाजिक किंवा आर्थिक संकटामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
भारत महासत्ता बनवण्यासाठी फिनलंडच्या शिक्षण व्यवस्थेचा आदर्श घेत आपल्या शिक्षण संस्थांमधील अडचणी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवर ठोस काम करावे लागेल, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा आणि पुरंदर मित्रमंडळ, मार्केटयार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिल मेहेर यांच्या हस्ते देशमुख-जाधव यांचा सत्कार करण्यात आला. मेहेर यांनी देशाच्या शिक्षण विभागाचे बजेट वाढवण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, विजय कोलते, केजे शिक्षण संस्थेचे कल्याणराव जाधव, शिवाजी खांडेकर, देवेंद्र बुट्टे-पाटील आणि चंद्रकांत कुंजीर आदींनी शैक्षणिक प्रश्नांवर विचारमंथन केले.
कार्यक्रमास अनिल पोमण, ॲड. भगवानराव साळुंखे, अप्पा बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. संग्राम कोंडे-देशमुख यांनी, पाहुण्यांचा परिचय शांताराम पोमण यांनी, तर आभारप्रदर्शन महेश ढमढेरे यांनी केले.





