Shirur News : गोरेपणाच्या जाहीराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला मृत्यूच्या दारात ढकलले
चेहरा उजळण्याच्या जाहीराती पाहून अपेक्षेने 'Elvis Gloaming Face Brightening Night Cream' ही क्रीम ऑनलाईन मागवून वापरल्याने मच्छिंद्र कदम यांची प्रकृती गंभीर झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

Shirur News – चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी आणि प्रशासनाला हादरवून सोडणारी घटना मलठण (ता. शिरूर) येथे समोर आली आहे. चेहरा उजळण्याच्या जाहीराती पाहून अपेक्षेने ‘Elvis Gloaming Face Brightening Night Cream’ ही क्रीम ऑनलाईन मागवून वापरल्याने मच्छिंद्र कदम यांची प्रकृती गंभीर झाल्याचा त्यांचा आरोप आहे. (Shirur News)
या क्रीममध्ये वापरले जाणारे पाऱ्याचे अंश शरीरात पसरल्याने त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. मणिपाल हॉस्पिटल, खराडी-पुणे येथे अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचे प्राण वाचले; मात्र या उपचारांसाठी तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे कदम यांनी सांगितले. (Shirur News)
चेहरा गोरा करण्याच्या नादात लाखोंचा फटका आणि जीव धोक्यात! (Shirur News)
दरम्यान, ही केवळ एका तरुणाची व्यथा नसून बाजारात बिनधास्त विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. चेहऱ्याचा रंग बदलण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार अशा कंपन्यांना कोणी दिला, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. (Shirur News)
सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि विविध जाहिरातींमधून काही दिवसांत चेहरा गोरा करण्याचे दावे केले जातात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आकर्षक पॅकिंग, मोठमोठे दावे आणि सवलतींचा आधार घेतला जातो. मात्र अशा उत्पादनांमध्ये नेमके कोणते रासायनिक घटक वापरले आहेत? त्यांची तपासणी झाली आहे का? उत्पादन सुरक्षित आहे का? याची खातरजमा कोण करणार?
एखादे उत्पादन वापरून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असेल, तर संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. केवळ जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून चालणार नाही; उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित क्रीमचे नमुने ताब्यात घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी करावी. त्यामध्ये पारा किंवा अन्य घातक घटक आढळतात का, याची खातरजमा करावी. तसेच उत्पादनाची निर्मिती, विक्री, वितरण, ऑनलाइन विक्री आणि आवश्यक परवानग्यांची सखोल चौकशी करावी.
तरुणांना कदम यांचा सावधगिरीचा इशारा!
मच्छिंद्र कदम यांनी इतर तरुणांना अशा क्रीमचा वापर करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आकर्षक जाहिराती आणि ऑनलाइन दाव्यांना बळी पडू नका. उत्पादनाची माहिती, घटक आणि सुरक्षितता तपासल्याशिवाय चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक उत्पादन वापरू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
मणिपाल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर महेश जाधव यांच्या प्रयत्नांमुळे गंभीर परिस्थितीतून बाहेर पडता आल्याचे सांगत कदम यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात ग्राहक आयोगासह सक्षम यंत्रणांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






