पुण्यात भोईराज संघाने फोडली मानाची दहीहंडी

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 – आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, तरुणाईचा उसळलेला सागर आणि सळसळता उत्साह…यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव यंदा सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. हजारो तरुणांच्या गर्दीसमोर कसबा पेठेतील भोईराज संघाने ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या विद्यमाने प्रथमच भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. एलईडी लाइट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखी आकर्षक करत होते. रात्री 10च्या सुमारास भोईराज दहीहंडी संघाने ही दहीहंडी फोडत तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी पटकावली.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, सिनेअभिनेते शरद केळकर, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे, विशाल मल्होत्रा, अभिनेत्री सोनल चव्हाण, अक्षया देवधर आदी उपस्थित होते.
करोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर झालेला हा दहीहंडी महोत्सव सर्वांना मनातून आनंद देणारा ठरला आहे. यामुळे आलेली मरगळ दूर झाली असून आगामी काळात पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.
– पुनीत बालन, उत्सव प्रमुख, विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट





