West Bengal Elections 2026 : बंगालमध्ये भाजपची भिस्त मोदींच्या करिष्म्यावर.! मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची रणनीती
पुढील काही दिवसांनंतर कुणाचा चेहरा पुढे करायचा का याविषयीचा निर्णय सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल.

West Bengal Elections 2026 – पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची प्रमुख भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावरच राहील. त्यातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोलामोलाचा उमेदवार भाजपकडे नसल्याचेही सूचित होत आहे.
मागील वेळेप्रमाणेच यावेळीही बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी मुख्य लढत अपेक्षित आहे. बंगालची सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
त्यातून त्या पक्षाने जय्यत तयारी केली आहे. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याविषयी तर्क-वितर्क सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
भाजपने विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना दोन जागांवरून निवडणूक मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ते पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, असा प्रश्न भट्टाचार्य यांना विचारण्यात आला.
त्यावर ते उत्तरले, भाजप कुणाला चेहरा म्हणून पुढे करत नाही. दिल्ली आणि हरियाणात चेहरा म्हणून कुठल्या नेत्याला प्रोजेक्ट करण्यात आले नाही. तरीही आमचा पक्ष जिंकला. ओडिशातही तसेच घडले.
कुठल्या चेहऱ्याच्या आधारावर आम्ही त्या निवडणुका लढवल्या नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यातून बंगालमध्ये भाजप चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
विकासपुरूष मोदींना समोर ठेऊन आम्ही निवडणूक लढवू. त्यांच्यावर काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या जनतेचा विश्वास आहे, अशी भूमिका भट्टाचार्य यांनी मांडली.
अर्थात, पुढील काही दिवसांनंतर कुणाचा चेहरा पुढे करायचा का याविषयीचा निर्णय सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल. पण, कुणाचा चेहरा पुढे केला जाण्याची शक्यता वाटत नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.






