निवडणूक गैरप्रकारप्रकरणी राजद्रोहाच्या खटल्याची इम्रान यांची मागणी

इस्लामाबाद – पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या गैरप्रकार प्रकरणी राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. ज्या अधिकार् यांनी निवडणुकीतील जनादेश चोरला, त्यांच्यावर हा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.
अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी इम्रान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना इम्रान यांनी या खटल्याची मागणी केली. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप होतो आहे.
पीटीआयच्या पाठिंब्यावरील ९० पेक्षा जास्त अपक्ष उमेदवार विजयी झाले असले, तरी पीएमएल-एन आणि पीपीपी पक्षांनी आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाला ३० दशलक्ष मते मिळाली.
तर उर्वरित १७ पक्षांना मिळून तेवढीच मते मिळाल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकमधील निवडणुकांमधील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्याचेही इम्रान म्हणाले.
नाणेनिधीने या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवावा, या मागणीसाठी अमेरिकेत नाणेनिधीच्या मुख्यालयाबाहेर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी आज निदर्शनेही केली. संसदेतील राखीव जागा पीटीआयला न देण्याच्या पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचेही इम्रान खान म्हणाले.





