इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पक्षाने केलेल्या देशविरोधी कारवायांमुळे या पक्षावर बंदी घालण्यात येणार आहे, असे आज पाक सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले. पीटीआय पक्षाने विदेशातून मिळवलेल्या देणग्या, देशव्यापी दंगलीतील या पक्षाचा सहभाग आणि देशविरोधी कारवायांमधील या पक्षाची भूमिका यामुळे या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानचे दूरसंचार मंत्री अताउल तरार यांनी ही माहीती दिली. इम्रान खान आणि पीटीआय पक्षाने देशाचे सार्वभौमत्व कमकुवत करण्यासाठी कारवाया केल्या आहेत आणि देशाच्या एकात्मतेला आंतरराष्ट्रीय पातळीवर हानी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआय आणि पाकिस्तान कधीही एकत्र राहू शकत नाही, असे तरार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या प्रकरणावर मंत्रिमंडळ आणि न्यायालय विचार करेल, असेही ते म्हणाले. सरकारने पीटीआयवर बंदी घालणे, राखीव जागांच्या प्रकरणी आढावा याचिका दाखल करणे आणि पीटीआयचे संस्थापक, देशाचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी आणि संसदेचे माजी उप सभापती कासिम सुरू यांच्यावर राज्यघटनेचे विघटन केल्याबद्दल खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही तरार यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करून देशविरोधी कारवाया करणाऱ्या एखाद्या पक्षावर बंदी घालण्याचा केंद्रीय सरकारला अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.