इम्रान दारूवाला अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार; नेवासा पोलिसांची कारवाई

नेवासा – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गृहखात्याच्या पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असणाऱ्या नेवासा शहरातील गुन्हेगार इम्रान दारूवाला याला अहमदनगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहीती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व उपविभागिय दंडाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. इम्रान दारुवाला याच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर पोलीस विभागाने दारुवाला याला छत्रपती संभाजीनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची कारवाई करण्यात आली असून नेवासा शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारांच्या हद्दपारीची आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड इशाराही यावेळी पोलीस निरिक्षक जाधव यांनी दिला.
कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारांची पोलिस विभाग गय करणार नाही. पोलीस प्रशासनास सहकार्य करून शहरासह तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेरांच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी यावेळी बोलतांना दिली.





