प्रभात वृत्तसेवा जामखेड (ओंकार दळवी )- नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. परंतु ही प्रक्रिया पूर्ण होताच शहरातील सोशल मीडियावर काही वाॅर्डांमधील “भावी नगरसेवक” म्हणून स्वतःची जाहिरात लावणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. काही माजी नगरसेवक पुन्हा आपली छबी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत तर काही नवखे चेहरे केवळ सोशल मीडियावर ‘मीच पुढचा’ अशी हवा निर्माण करताना दिसत आहेत. “जामखेडकर कोणाला संधी देणार?” या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी नागरिक चहाच्या टपऱ्यांपासून ते चौकात चर्चेत रंगले आहेत. मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांनी प्रशासक कार्यकाळातही आपल्या वाॅर्डात उल्लेखनीय कामे केली. मात्र, काही नगरसेवकांची कामे मंत्री दप्तरात गेल्याशिवाय हलली नाहीत, हे देखील लोक विसरलेले नाहीत. काही नगरसेवकांनी फक्त स्वतःच्या गल्लीत डांबरीकरण, लाईट व्यवस्था सुधारून “कामगिरी” दाखवली. काही नगरसेवकांना तर पाच वर्षांच्या कारकिर्दीत लोकांनी चेहरा देखील पाहिला नाही. इतकंच काय तर त्यांचा शोध घेण्यासाठी बोर्ड लावावा की काय , अशी कटू चर्चा जनतेत आहे. एका वाॅर्डात पाच वर्षांत एकही विकासकाम न झाल्यानंतरही संबंधित नगरसेवक आज पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून “पुन्हा घ्या” अशी छातीठोक जाहिरात सोशल मीडियावर झळकत आहे. काही तथाकथित भावी नगरसेवकांना काही महिन्यांपूर्वीच निवडणूक पुढे ढकलली जाईल, अशी माहिती मिळताच ते गायब झाले होते. मात्र, आरक्षण सोडत होताच अचानक “बिळातून बाहेर” येत त्यांनी सोशल मीडियावर आपली छबी झळकवायला सुरुवात केली आहे. काही जण “समाज माझ्या पाठीशी आहे” असा दावा करत आहेत, परंतु प्रत्यक्षात समाजात त्यांचा मागमूस नाही. आतापर्यंत कोणतेही सामाजिक कार्य न करता आता समाजसेवक असल्याचा दावा करीत आहेत. काही जण तर केवळ “मी सुद्धा रिंगणात” अशी दिखाऊ तयारी करत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांचाही पाठिंबा त्यांना नाही, अशी चर्चा शहरात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी व विरोधी पक्षांतही उमेदवारीसाठी तीव्र मंथन सुरू आहे. कोणत्या पक्षाकडून कोणते प्रस्थ मैदानात उतरणार आणि जनतेचा नवा विश्वास कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत केवळ पोस्टरबाजी, सोशल मीडिया गाजावाजा आणि घोषणांन चालणार नाही; कारण जामखेडकरांनी यावेळी विकासाच्या मुद्द्यांवर नगरसेवकांची कसोटी लावण्याचे संकेत दिले आहेत. ‘काम दाखवा, मत घ्या !’ जामखेडवासियांचे म्हणणे सरळ आहे, निवडणुकीच्या काही दिवस आधी समाजसेवक बनणे पुरेसे नाही. पाच वर्षांत केलेले काम, सेवा आणि बांधिलकी यावरच मतपेटी उघडेल. जनतेला तात्पुरता दिखावा नको, तर सातत्यपूर्ण काम हवे असते. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू होणारे काम हे फक्त मतांसाठी केलेले राजकारण दिसते. खरा नगरसेवक तोच, जो पाच वर्षे लोकांसोबत राहतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि त्यावर उपाय करतो.या वेळच्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी अशा ” सोशल मीडिया समाजसेवकां”पासून सावध राहून खरे काम करणाऱ्यांना साथ द्यावी, हाच लोकशाहीचा खरा विजय ठरेल.