नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी मंगळवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता कुकाणा आणि नेवासा फाटा येथे वाहन तपासणी दरम्यान अवैध मावा आणि देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर धडक कारवाई करत ९ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कुकाणा बस स्टँड चौकात वाहन तपासणी दरम्यान मारुती सुझुकी स्विफ्ट कार (MH-14-BR-1492) मधून १३० किलो कतरी सुपारी (मूल्य ४६,८०० रुपये) जप्त करण्यात आली. ही सुपारी मावा आणि सुगंधी तंबाखूसाठी वापरली जाणार होती. वाहनचालक अमोल काळे (वय २८, रा. उस्थळ दुमाला) याच्यावर गुन्हा दाखल करत ४ लाख रुपये किमतीची कारसह एकूण ४ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत, नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सिआझ कार (MH-01-CD-0416) मधून २०० देशी दारूच्या बाटल्या (मूल्य ७,००० रुपये) जप्त करण्यात आल्या. वाहनचालक रोहिदास गुंजाळ (वय ३३) आणि अभिषेक गुंजाळ (वय २२, दोघे रा. चिलेखनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. ५ लाख रुपये किमतीच्या कारसह एकूण ५ लाख ७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.





