नेवासा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई; टेम्पो जप्त, एकास अटक, तीन फरार

नेवासा : नेवासा पोलिसांनी शुक्रवारी (11 एप्रिल) अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संत तुकाराम महाराज चौकाकडे जाणारा वाळूने भरलेला टेम्पो (क्रमांक MH-12-JF-6288) उस्तळ दुमाला रोडवर पकडला.
याप्रकरणी आकाश कान्हु धोत्रे (वय 28, रा. गंगानगर, नेवासा खुर्द) याला ताब्यात घेण्यात आले, तर टेम्पो मालक संतोष राजगिरे यांच्यासह तिघांनी पोलिसांना पाहताच पळ काढला. नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 303 आणि 235 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, अविनाश वैद्य, दहिफळे आणि चालक संदीप बडे यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर दराडे करत आहेत.
पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “अवैध धंदे करणारे आणि कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे आणि नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.




