Satara | रिझर्व्ह बॅंकेकडून सहकारी बॅंकांवर चुकीचे निर्बंध

सातारा, (प्रतिनिधी) – राज्यातील पाचशे पेक्षा जास्त सहकारी बॅंका बंद झाल्या आहेत. अडचणीत सापडलेल्या बॅंकांना आधार देण्याएवजी त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध रिझर्व्ह बॅंकेकडून लावण्यात येत असून हे सहकारासाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या शतक महोत्सवी समारंभात खा. शरद पवार बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील मोहिते – पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. जयंत आसगावकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, बॅंकेचे चेअरमन किरण यादव, व्हा. चेअरमन शहाजी खाडे,
शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजयराव कोंबे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, अखिल शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव,
अखिल सातारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, डॉ. अरुणा बर्गे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, देशात दोन ते तीन राज्यांनी सहकारात उठावदार कामगिरी करत आपले वेगळेपण निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य तर सहकारात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
मात्र सध्या सहकारात अडचणीत आणण्याचे उद्योग होत आहेत. अडचणीतील संस्थांना आधार देण्याएवजी त्यांना निर्बंध लादून आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील पाचशेहून अधिक बॅंका बंद पडल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लावावेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही मात्र ज्या बॅंका पुन्हा स्थिरस्थावर होवू शकतात त्यांना सहकार्यही केले पाहिजे.
सातारची प्राथमिक शिक्षक बॅंक ही नावाजलेली बॅंक असून कर्ज वितरण, कर्ज वसुली यामध्ये बॅंक अग्रेसर आहे.
खा. धैर्यशील मोहिते – पाटील म्हणाले, शिक्षकांना आर्थिक उंची देण्याचे काम शिक्षक बॅंकेकडून होत असून बॅंक शिक्षकांसाठी विविध योजना राबवत आहे. बॅंकेचा शतकी महोत्सव साजरा होणे ही बाबही निश्चितच समाधानकारक आहे.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. शरद पवार यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र सध्या शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावून वेठीस धरण्याचे काम होत आहे.
संभाजीराव थोरात म्हणाले, केंद्रातील सहकार खात्याने अध्यादेश काढून सेवानिवृत्तांचा सभासद होण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जे सेवानिवृत्त सभासद आहेत त्यांची कर्ज वसुली होण्यात अडचणी येणार आहेत. पवार साहेब दिल्लीत तुमच्या शब्दाला वजन असून याप्रश्नी आपण आवाज उठवावा.
उदय शिंदे म्हणाले, गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून शरद पवारांचा शिक्षक बॅंकेशी ऋणानुबंध आहे. त्यांनी शिक्षकांना केंद्राप्रमाणे तरतुदी लागू केल्याने आज शिक्षकांची आर्थिक प्रगती होताना दिसत आहे. आ. जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
किरण यादव म्हणाले, पगारदार नोकरांच्या बॅंकेत ही बॅंक अग्रणी असून बॅंकेने नेहमीच सभासदाभिमुख कार्यभार केला आहे.
बॅंकेने सभासदाभिमुख व पारदर्शक कारभार केल्याने राज्यात नावलाैकिक मिळवला आहे. आज गुगल पे व फोन पे चा शुभारंभ होत असल्याचे समाधान आहे. यावेळी श्री. यादव यांनी बॅंकेच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला.
या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या १०० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘शतार्थ’या स्मरणिकेचे प्रकाशन, एटीएम कार्ड, डीजीटल बॅंकिंग युपीआय कार्डचे वितरण, अकरा ज्येष्ठ सभासद व बॅंकेच्या सर्व माजी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे लिखित प्रभातरंग या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
बॅंकेचे संस्थापक कृ. बा. बाबर यांचे नातू यशवर्धन पवार (चितळी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे नेते शंकर देवरे, बॅंकेचे संचालक नवनाथ जाधव, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, विशाल कणसे, संजीवन जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कदम यांच्यासह संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर, बॅंकेचे सभासद, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बॅंकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन शहाजी खाडे यांनी आभार मानले.
संभाजीराव थोरातांची जोरदार फटकेबाजी
शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांनी आपल्या मनोगतात जोरदार फटकेबाजी केली. प्राथमिक शिक्षकांशी अधिकारी आणि लाेकप्रतिनिधींनी कधीच पंगा घेवू नये, असा गर्भित इशाराच त्यांनी दिला.
मुळात शिक्षक कोणाच्या नादाला लागत नाहीत आणि नादाला लागला तर दुसऱ्याचा नाद पुरा केल्याशिवाय गप्प बसत नाही. शिक्षक कधीच राजकारणात सहभागी होत नाहीत मात्र त्यांनी जर लक्ष घातले तर चित्र वेगळे अनुभवायला मिळेल.
शिक्षक संघ व शिक्षक समिती हे जुळे भाऊ असून मी आणि उदय शिंदे यांनी एकत्र येत राज्यातील ९५ टक्के शिक्षक बॅंकांवर वर्चस्व निर्माण केले आहे. आमच्या दोघांचाही बॅंकेच्या कारभारात कसलाही हस्तक्षेप नसतो. मी तर बॅंकेची निवडणूकही लढलाे नाही त्यामुळे विरोधकांनी आरोप करताना विचारपूर्वक करावेत, असा टोला संभाजीराव थोरात यांनी विरोधकांना दिला.





