HDFC Bank : एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही भारतातील महत्त्वाची बँक आहे. या बँकेचे प्रशासन उत्तम आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती कमालीची बळकट आहे असे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँकेकडून करण्यात आले आहे. नैतिक कारणावरून एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअरचा भाव 5% पर्यंत कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालयाने हे स्पष्टीकरण केले आहे. वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी सांगितले की, एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) सर्व मूलभूत बाबी आमच्या माहितीप्रमाणे बळकट आहेत आणि रिझर्व बँकेने यावर शिक्का मुहूर्त केले आहे. या अगोदर रिझर्व बँकेने एचडीएफसी बँकेच्या प्रशासनात कसल्याही चुका आढळून आल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. HDFC Bank रिझर्व बँकेचे प्रत्येक बँकेच्या कामकाजाकडे लक्ष असते. आमच्या माहितीप्रमाणे एचडीएफसी बँकेचे कामकाज नियमाप्रमाणे झाले आहे. याबाबत चिंता करण्यासारखी कसलीही परिस्थिती नाही असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या आवाहनानुसार रिझर्व बँकेने केकी मिस्त्री यांची अंतरीम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. आगामी काळातही रिझर्व बँक एचडीएफसी बँकेच्या संपर्कात राहणार आहे. दरम्यान एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिशन यांनी चक्रवर्ती यांना राजीनाम्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे. त्यांना कोणत्या बाबी खटकतात याबाबत स्पष्टीकरण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या राजीनामा पत्रातील काही शब्द वगळण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची सूचना केली आहे. एचडीएफसी बँक नियमाप्रमाणे उत्तमरीत्या काम करीत आहे. चक्रवर्ती यांनी त्यांना वाटणारी चिंता स्पष्ट केलेली नाही. संचालक मंडळातील सदस्यांनी चक्रवर्ती यांना विशिष्ट बाबी स्पष्ट करण्याची सूचना केली होती. मात्र राजीनामा पत्रामध्ये तसे काही करण्यात आलेले नाही. सध्या संचालक मंडळाचे चार सदस्य रिझर्व बँक आणि चक्रवर्ती यांच्या संपर्कात आहेत.