Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. “मी स्वतःला ‘गांधीवादी’, ‘नेहरूवादी’ आणि ‘राजीववादी’ मानतो, पण मी ‘रावुलवादी’ नाही,” असे स्पष्ट विधान त्यांनी केले आहे. राहुल गांधी हे माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत आणि राजकीय जीवनात ते माझ्यापासून खूप दूर आहेत, असे सांगत त्यांनी हे विशेषण नाकारले. एका मुलाखतीदरम्यान बोलताना अय्यर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आणि विचारांचा खुलासा केला. विशेष म्हणजे, त्यांनी इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख टाळला. “मी ‘इंदिरावादी’ नाही, कारण त्यांनी १८ महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर केले होते, जे मला पूर्णपणे अमान्य आहे,” असे त्यांनी परखडपणे सांगितले. विचारांच्या वारशावर भाष्य – अय्यर यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी सहा वर्षांचा असताना महात्मा गांधींनी मला आणि माझ्या भावाला कडेवर घेतले होते. तेव्हापासून मी ‘गांधीवादी’ झालो. माझे संपूर्ण बालपण आणि तारुण्य नेहरूंच्या विचारांच्या प्रभावाखाली गेले. त्यामुळे मी स्वतःला ‘नेहरूवादी’ मानतो. राजीव गांधी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होते, पण त्यांनी मला पंतप्रधान कार्यालयात (PMO) काम करण्याची संधी देऊन थक्क केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी ‘राजीववादी’ झालो. राहुल गांधींबाबत बोलताना ते म्हणाले, “ज्या मुलाचे वय माझ्यापेक्षा ३० वर्षांनी कमी आहे आणि ज्याच्यासोबत मला काम करण्याची संधीच मिळालेली नाही, त्याचा अनुयायी (Rahulian) मी कसा असू शकतो?” काँग्रेसशी वाढता संघर्ष – गेल्या काही दिवसांपासून मणीशंकर अय्यर आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. केरळमधील एका कार्यक्रमात अय्यर यांनी डाव्या आघाडीचे (LDF) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे कौतुक करत तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. या विधानामुळे काँग्रेसने तात्काळ हात झटकले असून, अय्यर यांच्याशी पक्षाचा गेल्या काही वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. पक्षातील सहकाऱ्यांवर जहरी टीका – अय्यर यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरही आगपाखड केली आहे. त्यांनी शशी थरूर यांचा उल्लेख ‘तत्वशून्य संधीसाधू’ असा केला, तर के. सी. वेणुगोपाल यांना ‘राऊडी’ (उद्धट) म्हटले. तसेच रमेश चेन्नीथला यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. हेही वाचा – ‘तर अमोल कोल्हे झाले असते प्रदेशाध्यक्ष’; रोहित पवारांच्या दाव्यावर कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया