Pimpri : न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला डावलून बेकायदेशीर काम सुरू : बहल

पिंपरी : चर्होली परिसरातील चोवीसावाडी येथे काम करण्यास उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना गेल्या पाच दिवसांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू करण्यात आले आहे, असा आरोप करत राष्ट्रावादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना योगेश बहल म्हणाले, अवैध उत्खननाविरोधात दिघी पोलीस ठाणे, महसूल विभाग, जिल्हाधिकारी पुणे व तहसीलदार हवेली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असूनही अद्याप कारवाई झाली नाही. यासाठी दिघी पोलीस स्टेशन व उत्खनन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने चर्होली येथील सर्व्हे क्रमांक १८२, १८३ या भूखंडावर ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
असे असताना या सर्व्हे नंबर जमिनीला वॉल कंपाऊंड करणे व विनापरवाना उत्खनन सुरू केले आहे. म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवत दिवसा ढवळ्या उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते. येथील बेकायदेशीर उत्खनन करणारे ५ ते ७ पोकलेन १५ ते २० डंपर तात्काळ जप्त करावे. कारण येथील न्यायप्रविष्ट विषय असताना काहीच्या मदतीने राजरसपणे कामकाज सुरू आहे. हा विषय गंभीर वळणावर आला असून, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाची तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असल्याचे बहल यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचा स्पष्ट जैसे थे आदेश असताना संबंधित भूभागावर उत्खनन सुरू ठेवणे म्हणजे न्यायप्रक्रियेचा व कायद्याचा अवमान आहे, असे मत बहल यांनी व्यक्त केले. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे, स्थानिक पोलीस स्टेशन, दिघी तसेच हवेली तहसीलदार कार्यालय यांना तक्रार अर्ज दिला आहे.





