Real Life Real People: ‘सावली’ निवारा केंद्र चालविणाऱ्या संस्थेची मुदत संपली; आता निविदेच्या प्रक्रियेत अडकणार?
आता निविदेच्या प्रक्रियेत अडकणार? राज्यात सर्वोत्तम ठरलेल्या केंद्राची जबाबदारी पुन्हा त्याच संस्थेला देण्याची नागरिकांची मागणी

पिंपरी – रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्थानक परिसरात किंवा मंदिराच्या पायरीवर दिवस काढणाऱ्या बेघरांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘सावली’ निवारा केंद्र म्हणजे आयुष्याला मिळालेला मायेचा आधार आहे. गेल्या सहा वर्षांपासून ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ ही संस्था या केंद्राचे कामकाज सांभाळत असून, अनेक निराधारांना जगण्याचा नवा विश्वास देत आहे.
संस्थेच्या कामाची दखल घेत या केंद्राला राज्यातील सर्वोत्तम केंद्राचा सन्मान मिळाला आहे. मात्र, या संस्थेची मुदत संपल्याने आता महापालिका प्रशासनाने नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याची घाई सुरू केली आहे. त्यामुळे सहा वर्षांत विश्वासाचे नाते निर्माण केलेल्या संस्थेचीच जबाबदारी काढून घेतली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील बेघर, निराधार आणि निराश्रित नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने महापालिकेने ‘सावली’ निवारा केंद्र सुरू केले. मात्र, अशा केंद्राचे यश केवळ इमारत उभारण्यात किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात नसते, तर तेथील माणसांना आपलेपणाची जाणीव करून देण्यात असते.
गेल्या सहा वर्षांपासून ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ संस्था ही जबाबदारी पार पाडत आहे. बेघर नागरिकांची काळजी घेणे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आधार देणे, अशा स्वरूपाचे काम संस्थेकडून केले जात आहे.
संस्थेची मुदत संपल्याने प्रशासनाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे. नियमानुसार निविदा प्रक्रिया करणे हा प्रशासनाचा अधिकार असला, तरी सहा वर्षे सातत्याने उत्कृ-ष्ट काम करणाऱ्या संस्थेच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करून केवळ निविदेच्या प्रक्रियेला प्राधान्य देणे योग्य ठरेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवीन संस्था नियुक्त झाल्यास कामकाज समजून घेणे, लाभार्थ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि व्यवस्थेचा अनुभव मिळविण्यासाठी काही काळ जाऊ शकतो. या संक्रमणाचा फटका केंद्रातील ८० बेघर नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासाठी हे केंद्र म्हणजे हक्काचे छप्पर आणि सुरक्षिततेची जागा बनले आहे. रस्त्यावरचे अनिश्चित आयुष्य मागे सोडून या नागरिकांना येथे स्थिरतेचा आधार मिळाला आहे.
अनेकदा बेघर व्यक्तींकडे समाजाचे दुर्लक्ष होते. त्यांच्या अडचणी, आजारपण, मानसिक अवस्था आणि जगण्याचा संघर्ष याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. अशा नागरिकांना केवळ निवारा न देता माणूस म्हणून सन्मान देण्याचे काम या संस्थेने केले आहे.
पुरस्कारांनी कामाची पोचपावती
गेल्या सहा वर्षांत संस्थेने केलेल्या कामाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. ‘सावली’ निवारा केंद्राला राज्यातील सर्वोत्तम केंद्र म्हणून राज्य शासनाकडून गौरविण्यात आले असून, अनेक पुरस्कारांनी संस्थेच्या कार्याचा सन्मान झाला आहे.
ही केवळ संस्थेची कामगिरी नसून महापालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमालाही मिळालेली पोचपावती आहे. त्यामुळे अशा यशस्वी व्यवस्थेचा अनुभव आणि सातत्य कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
संस्थेला थेट मुदतवाढ देण्याची मागणी
‘सावली’ केंद्राच्या कामात सातत्य राहावे, लाभार्थ्यांना परिचित कर्मचारी आणि विश्वासाचे वातावरण मिळत राहावे, यासाठी विद्यमान संस्थेलाच पुन्हा जबाबदारी देण्याची मागणी होत आहे. सहा वर्षांचा अनुभव, राज्यस्तरीय गौरव आणि प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता या बाबींचा विचार करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची भूमिका आहे.
फक्त निवाराच नाही तर हाताला कामही दिले
ऑक्टोबर २०२० ते जून २०२६ या कालावधीत संस्थेने तब्बल ८४८ बेघर नागरिकांचे पुनर्वसन केले आहे. यामध्ये १५९ जणांना कामासाठी पाठविण्यात आले, तर ४४६ जणांना त्यांच्या घरी किंवा नातेवाइकांकडे पाठविण्यात आले. ९२ जणांना उपचारासाठी, ६३ जणांना अन्य संस्थांकडे पाठविण्यात आले, तर ८८ जण स्वतःच्या इच्छेने केंद्रातून बाहेर पडले.
बेघर नागरिकांना केवळ निवारा देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेने केले आहे. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविताना या कामगिरीचा विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.
‘२०१० पासून मी वायसीएम रुग्णालयामध्ये सामाजिक कार्य करत आहे. सहा वर्षांपासून सावली निवारा केंद्र चालवत आहे. सावलीच्या माध्यमातून शेकडो गोर-गरीबांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भविष्यात देखील हजारो नागरिकांचा आधार म्हणून जगायचे आहे. वायसीएम रुग्णालयात देखील सतरा वर्षांपासून विनामूल्य सेवा करत आहे.’ – एम. ए. हुसैन, सामाजिक कार्यकर्ते, रिअल लाइफ रिअल पीपल.





