Pimpri-Chinchwad: लाडक्या बहिणींना भाजपने ठेवले दूर; स्वीकृत नगरसेवकांच्या सातही जागांवर पुरुषांनाच संधी
महिला कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा

पिंपरी – विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा गाजावाजा करून महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत मात्र महिलांना दूरच ठेवले आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या सातही स्वीकृत नगरसेवकांच्या नावांमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या भाजपला प्रत्यक्ष राजकीय प्रतिनिधित्व देताना महिलांचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपने सात पुरुषांची नावे जाहीर केली आहेत. सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे यांना पक्षाने संधी दिली.
मात्र, या सात नावांमध्ये एकाही महिला कार्यकर्तीला स्थान मिळाले नाही. महापालिकेतील महिला आरक्षणामुळे आधीच महिलांना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध असली, तरी स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून अनुभवी आणि पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना सभागृहात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. ती भाजपने धुळीस मिळवली आहे.
विशेष म्हणजे, स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या आणि संघटनात्मक पातळीवर योगदान देणाऱ्या महिलांना यावेळी संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, अंतिम यादीत महिलांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
एकीकडे महिला सक्षमीकरण, महिलांना राजकारणात संधी आणि लाडकी बहीण अशा घोषणांमधून भाजप महिलांच्या पाठिंब्याचे राजकारण करते. दुसरीकडे, महापालिकेच्या महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी असलेल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या सातही जागा पुरुषांसाठी राखीव असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षात सक्षम महिला नेतृत्व नाही की महिलांना संधी देण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बहीणी आता नकोशा का?
स्वीकृत नगरसेवकपद हे केवळ राजकीय पुनर्वसनाचे साधन नसून शहराच्या प्रश्नांवर सभागृहात भूमिका मांडण्याची संधी आहे. अशा संधीपासून महिलांना दूर ठेवून भाजपने महिला कार्यकर्त्यांना नेमका कोणता संदेश दिला आहे, याची चर्चा आता पक्षांतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी लाडक्या असलेल्या बहिणी सत्तेतील प्रतिनिधित्व देताना मात्र नकोशा झाल्या का, असा सवालही उपस्थित होत आहे.
PCMC News: डीपीवरील सुनावणी अंतिम टप्यात; ४९ हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण





