Ajitsrushti: ‘अजितसृष्टी’साठी दीड कोटींची तरतूद; स्थायी समितीच्या सभेत उपसूचना
प्रभाग क्रमांक १६ मधील कामाच्या निधीतून रक्कम वळवली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ ‘अजितसृष्टी’ उभारण्यात येणार आहे.
या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातील दुसऱ्या विकासकामाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील एका विकासकामाच्या तरतुदीतून तब्बल दीड कोटी रुपये कमी करून हा निधी ‘अजितसृष्टी’साठी वळविण्याची उपसूचना स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आली आहे.
महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजितदादा पवार यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्याच्या ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थायी समितीच्या ठरावाला उपसूचना देण्यात आली आहे.
या उपसूचनेनुसार, प्रभाग क्रमांक १६ मधील एका विकासकामासाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक कोटी ५० लाख रुपयांची घट प्रस्तावित आहे. दिलेल्या उपसुचनेनुसार तक्त्यामध्ये वाढीच्या रकान्यात कोणतीही रक्कम नसून, घट या रकान्यात दीड कोटी रुपयांची नोंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या परिसरातील विकासकामासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा काही भाग स्मारकाच्या उभारणीसाठी वळविण्यात आला आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा, स्मारक आणि शहराच्या विकासाची माहिती देणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्याची संकल्पना यापूर्वीच मांडण्यात आली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही जाहीर झाले होते.
Expensive two-wheelers : महागड्या दुचाकीची क्रेझ घेणे सोपे, चालविणे महाग





