ठाण्यातील बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश; एटीएसकडून एकाला अटक

मुंबई – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे जिल्ह्यातील सुरु असलेल्या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर छापा टाकून पर्दाफाश केला. टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल्स हे स्थानिक कॉल्समध्ये रुपांतरीत करण्यात येत होते. त्याबरोबरीने याचा वापर दहशवादी कारवायांसाठी केला जात असावा, असा संशय पोलीसांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
या टेलिफोन संदर्भात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने ९ सिम बॉक्स, २४६ सिमकार्ड, ८ राउटर, सिम बॉक्स ऑपरेट करण्यासाठी वापरले जाणारे १९१ अँटेना आणि एक इन्व्हर्टर एवढे साहित्य जप्त केले आहे.
हे अनाधिकृत टेलिफोन एक्स्चेंज दीड वर्षांपासून सुरु असल्याचा संशय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला असून यामुळे दूरसंचार विभागाचे सुमारे ३ कोटी रुपयांची नुकसाच झाल्याचे सांगितले.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने जाफर बाबू उस्मान पटेल (४०) याला या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, भारतीय टेलिग्राफ कायदा, दूरसंचार कायदा आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.





