Illegal Liquor Seized : पोलिसांनी उधळला ‘टँगो’चा बेत! दुचाकीवरून दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
Illegal Liquor Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; कारेगाव परिसरात नाकाबंदी दरम्यान देशी दारूचा साठा जप्त.

Illegal Liquor Seized – रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई कारेगाव येथील यशईन चौक परिसरात शनिवारी सकाळी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान यशईन चौक येथे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण आणि पथक नाकाबंदी करत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, स्प्लेंडर मोटारसायकलवरून बेकायदेशीर दारूची वाहतूक केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार पंडित मुंडे यांनी पंचांसह सापळा लावला. यावेळी एमएच १६ एएन ७५०५ या क्रमांकाची दुचाकी थांबवून तपासणी केली असता, त्यावर असलेल्या पांढऱ्या गोणीत ‘टँगो’ देशी दारूच्या ९० मिलीच्या ३०० बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीची दारू आणि ३० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ४२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी सलमान बशीर खान (वय १९) आणि अमिन सदार खान (दोघे रा. राजमुद्रा चौक, रांजणगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत ही दारू नानासाहेब कोंडीबा चोरमले (रा. बोरी चिंचणी, ता. श्रीगोंदा) याच्या सांगण्यावरून नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली असून, मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





