प्रभात वृत्तसेवा पारगाव – सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या पारगावामध्ये मुख्य चौकाच्या कडेला रिचवून टाकलेल्या मोकळ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा (फुगे) खच पडत आहे.पारगाव हे तालुक्यातील एक मोठे गाव असून ३० वर्षांपूर्वी स्व. आबासाहेब करमरकर, वसुधा सरदार व काही तरुणांनी दारूबंदीसाठी उभ्या केलेल्या चळवळीमुळे आजतागाईत गावात वाईन्स किंवा परमिट रूमची दुकाने निर्माण झाली नाहीत. म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात पारगावचे नाव आहे. परंतु हल्ली तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जात असल्याने गावात अशांततेचे वातावरण तयार होत आहे.पारगावमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी गायरान जमीन असल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचाच फायदा या दारू विक्रेत्यांनी घेतला असून अनेक दिवसांपासून या ठिकाणी ही अनधिकृत दारू विक्री होत आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा हे व्यवसाय मोडले आहेत. परंतु ते कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा चालू होत आहेत.याचा शोध पोलीस खात्याने घेणे जरुरीचे आहे. गावातच दारू मिळत असल्याने गावात भांडण तंटे वाढले आहेत.काल एका नागरिकांने याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला होता. पोलिसांनी अनधिकृत दारू विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.