Illegal Liquor Seized : देहूरोड पोलिसांचा मोठी कारवाई! साडेचारशे लिटर गावठी दारू जप्त, ११ जणांवर गुन्हा
Illegal Liquor Seized : फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अॅक्शन मोडमध्ये; देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम.

Illegal Liquor Seized – फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्रेत्यांविरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागांत छापेमारी करून ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सुमारे ४७ हजार ५०० रुपये किमतीची साडेचारशे लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
फुगेवाडी येथील दुर्दैवी घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध मद्यविक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.
गांधीनगर, एम्बीकॅम्प, शितळानगर, किन्हई, मामुर्डी, देहूगाव आणि विठ्ठलवाडी परिसरात छापे टाकून मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त करण्यात आली. विविध आरोपींकडून १५ ते ९३ लिटरपर्यंत गावठी दारू हस्तगत करण्यात आली असून एकूण जप्ती साडेचारशे लिटरपर्यंत पोहोचली आहे. या कारवाईत गांधीनगर परिसरातील अनेक संशयितांकडून दारू जप्त करण्यात आली.
तसेच शितळानगर, मामुर्डी, किन्हई, देहू आणि विठ्ठलवाडी परिसरातही पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर छापे टाकले. कारवाई करण्यात आलेल्या सर्व आरोपींना दररोज देहूरोड पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


