Fugewadi Hooch Tragedy : फक्त ६६०० रुपयांसाठी १८ बळी? फुगेवाडी विषारी दारूकांडाचा धक्कादायक खुलासा
Fugewadi Hooch Tragedy : मिथेनॉल शरीरात जाताच यकृत, मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यूचा धोका; विषारी दारूकांडानंतर पोलिसांची संपूर्ण परिसरात अवैध अड्ड्यांवर मोठी कारवाई.

Fugewadi Hooch Tragedy – अधिक पैशाच्या हव्यासापोटी १८ निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव फुगेवाडी विषारी दारू प्रकरणाच्या तपासातून समोर आले आहे. घातक रसायनांची भेसळ करून तयार करण्यात आलेल्या दारूमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मृत्यूचे तांडव घडल्याचा संशय पोलीस तपासातून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आर्थिक गणित, आरोपींची साखळी आणि पुरवठा व्यवस्था समोर आल्यानंतर तपास यंत्रणाही हादरल्या आहेत. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने दारूमध्ये घातक रासायनिक पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने ९ मे रोजी सुमारे १७ हजार ५०० रुपयांचे २१० लिटर मिथेनॉल खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
त्यानंतर २३ मे रोजी त्याने गावठी दारूमध्ये भेसळ करण्याचा डाव आखल्याचे उघड झाले. तपासानुसार, उरळी कांचन येथून पाच ड्रम गावठी दारू खरेदी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि मिथेनॉल मिसळून तयार द्रवाचे प्रमाण वाढविण्यात आले. सुमारे २७ हजार रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा साठा ३३ हजार ६०० रुपयांना विकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या व्यवहारातून आरोपीला केवळ ६ हजार ६०० रुपयांचा फायदा झाला. मात्र या अल्पशा रकमेसाठी अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र आहे. तपासातील आणखी एक महत्त्वाचा खुलासा फुगेवाडी परिसरातून झाला आहे. येथेच घातक मिश्रण तयार करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. काही आरोपींनी आपल्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रासायनिक मिश्रण तयार करून त्याचा साठा केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर हे मिश्रण विविध भागांमध्ये पुरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणातील पुरवठा साखळीही तपासात उघड झाली आहे. गावठी दारूची निर्मिती, खरेदी, भेसळ आणि वितरण अशा टप्प्यांमधून हे जाळे कार्यरत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांपर्यंत हा साठा पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती अपेक्षेपेक्षा मोठी असल्याचे दिसून येत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन आहे. ते शरीरात गेल्यानंतर काही तासांत गंभीर परिणाम दिसू लागतात. सुरुवातीला मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यानंतर डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो. यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. वेळेत उपचार न मिळाल्यास हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होऊ शकतो.
दरम्यान, या प्रकरणानंतर पोलीसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. संशयित ठिकाणांवर धाडी टाकल्या जात असून संबंधित आरोपींची चौकशी सुरू आहे. या मृत्यूकांडामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी तपास करत आहेत.






