Sunil Gavaskar : “सडपातळ लोक हवे असतील तर, मॉडेल्सना संघात घ्या…”; रोहित शर्माला ‘लठ्ठ’ म्हणणाऱ्यांना सुनील गावस्करानी सुनावलं

Rohit Sharma | काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ‘लठ्ठ’ आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे अशी टिप्पणी करतानाच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाला अप्रभावी म्हटले आहे.
वाद निर्माण झाल्यानंतर आपण हे सामान्यपणे म्हटले असल्याचे सांगत शमा यांनी आपल्या विधानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवले आहे. दरम्यान, यावर आता दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, “क्रिकेट हे मानसिक बळावर आधारित असून, खेळाडूच्या शारीरिक स्वरूपाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जर निवडीचा पहिला निकष फिटनेस असेल तर मॉडेल्सना संघात निवडलं पाहिजं’. मी नेहमीच म्हटलं आहे की, जर तुम्हाला फक्त सडपातळ मुलं हवी असतील, तर तुम्ही मॉडेलिंग स्पर्धांमध्ये गेलं पाहिजे आणि तेथून मॉडेल्सची निवड करायला हवी.
तुम्ही क्रिकेट किती चांगले खेळू शकता याबद्दल सर्व आहे. आम्ही सरफराज खानबद्दल बोलत होतो. त्याचं वजन जास्त असल्याने बराच काळ त्याला बदनाम केलं गेलं. पण जर त्याने कसोटी सामन्यात भारतासाठी 150 धावा केल्या आणि त्यानंतर आणखी दोन किंवा तीन अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या तर काय हरकत आहे?
मला वाटत नाही की आकाराचा त्याच्याशी काही संबंध आहे. तुमची मानसिक ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही अंतर टिकवू शकता की नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगली फलंदाजी करा, जास्त वेळ फलंदाजी करा आणि धावा करा,” असं ते पुढे म्हणाले.
शमा मोहम्मद नेमकं काय म्हणाल्या?
शमा मोहम्मदने ‘X’ वर लिहिले, ‘रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे. तसेच, तो भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कर्णधार आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री यांसारख्या माजी खेळाडूंच्या तुलनेत त्याच्यात असे काय खास आहे. तो एक सरासरी कर्णधार आहे आणि त्याचबरोबर एक सरासरी खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला आहे’.
वाद वाढताच डॉ. शमा मोहम्मद यांचा यू-टर्न :
काँग्रेसच्या सूचनांनंतर आणि सर्व गोंधळ पाहून शमा मोहम्मद यांनी त्यांची वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘खेळाडूंच्या फिटनेसबाबत हे एक सामान्य ट्विट होते. हे बॉडी शेमिंगबद्दल नव्हते. मला वाटलं त्याचं वजन जास्त आहे, म्हणूनच मी ट्विट केलं. मला कोणत्याही कारणाशिवाय लक्ष्य केले जात आहे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. मी फक्त माझा मुद्दा मांडला.
जेव्हा मी त्याची तुलना माजी कर्णधारांशी केली तेव्हा तीही चुकीच्या पद्धतीने घेतली गेली. मला म्हणायचे होते ते म्हणजे विराट कोहलीकडे पाहा. तो त्याच्या सहकारी खेळाडूंना कसे प्रोत्साहन देतो. मी हे देखील सांगू इच्छितो की जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानकडून सामना हरला तेव्हा बरेच लोक मोहम्मद शमीला लक्ष्य करत होते. त्यावेळी विराट कोहली शमीसोबत उभा होता.





