“हेल्मेट घातलं नाही तर होईल अशी अवस्था….’; जवानचा व्हिडिओ शेअर करत दिल्ली पोलिसांनी केलं सावध

मुंबई – बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ चित्रपटाने वादळ आणलं असून अभिनेता शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्याला बॉलिवूडचा ‘बादशाह’ का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. जवान चित्रपटाने चित्रपटगृहांना असे दिवस दाखवले आहेत,
ज्यांचा कधी त्यांनी विचारही केला नसावा. पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडणाऱ्या जवान चित्रपटाचं वेड चौथ्या दिवशीही कायम राहील असून, सध्या या चित्रपटाने 235 ते 250 कोटींच्या पुढे कमाई केली आहे.
फक्त भारतच नाही तर जगभरात शाहरुख खानची क्रेझ दिसत असून, याचा परिणाम आता दिल्ली पोलिसांवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली पोलीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नेटकऱ्यांच्या तक्रारी, विविध प्रकारचे नियम आणि राज्यभरात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देतात.
यावेळी त्यांनी बाईक चालवताना हेल्मेट वापरा अशी जनजागृती करण्यासाठी जवान चित्रपटाच्या एका व्हिडिओचा आधार घेतला आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर भन्नाट अश्या कमेंट देत आहे.
BACHCHA, BADA YA JAWAN,
HELMET BACHA SAKTA HAI JAAN!#RoadSafety pic.twitter.com/SAHZpoyjl5— Delhi Police (@DelhiPolice) September 10, 2023
बाईक असो किंवा स्कुटर कोणतही दुचाकी वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपला जीव वाचतो. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला जाऊ शकतो. खरं तर चालकांच्या सुरक्षेसाठीच हा नियम करण्यात आला आहे. पण काही मंडळी नियम झुगारत हेल्मेट वापरणं टाळतात.
अशा बाईक रायडरला सावध करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. “बच्चा, बडा या जवान, हेल्मेट बचा सकता है आपकी जान…’ असा मेसेज या पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांनी दिला आहे.
यामध्ये शाहरूख खानच्या संपूर्ण चेहऱ्यावर बँडेज लावलेले दिसत आहेत. जर तुम्हाला हा लूक टाळायचा असेल तर हेल्मेट वापरा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. दिल्ली सोबतच उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.





