रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही. या योजनेत गरिबांचा विचार करण्यात आला आहे. ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. जुलै महिन्यात या योजनेचे फॉर्म भरता आले नाही व ऑगस्ट महिन्यात जरी फॉर्म भरले तरी जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे मिळतील. या योजनेद्वारे 45 हजार कोटी रुपये देण्यात येणार असून त्यामुळे बाजारपेठेत ही एवढी रक्कम येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर दौर्यावर जात असताना रांजणगाव गणपती येथे वाढदिवसानिमित्त महागणपती मंदिरात आरती त्यांनी केली. या वेळी शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या वतीने व रांजणगाव देवस्थानच्या वतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. रांजणगाव येथे पवार यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला व युवती समवेत त्यांनी शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेविषयी चर्चा केली. ते म्हणाले शासनाची लाडकी बहीण योजना ही अजितदादाचा वादा आहे. विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे; मात्र हा अजितदादाचा वादा व शब्द असल्याचे सांगून गरिबांना सक्षम करणारी ही योजना असल्याचे सांगत पवार यांनी विरोधकांना फटकारले. पवार म्हणाले की, वाढदिवसाला मी घरी आईजवळ थांबून वाढदिवस साजरा करीत असतो; परंतु यंदाचा वाढदिवशी सकाळीच आईचा आशीर्वाद घेऊन माता भगिनींना भेटण्यासाठी दौर्यावर निघालो आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी उप सभापती आबासाहेब पाचुंदकर, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, देवस्थान उपाध्यक्ष संदीप दौंडकर, मुख्य विश्वस्त ओंकार देव, सचिव तुषार पाचुंदकर, माजी बाजार समिती सभापती प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, रांजणगावच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, बालाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन सदाशीव पवार, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे आदी उपस्थित होते. विविध घटकांसाठी योजना महायुती शासनाने शेतकरी, महिला, युवकांसह समाजातील विविध घटकांसाठी चांगला योजना आणल्या आहेत. जातीय सलोख्या राहावा व शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेण्याचे काम करीत असून विकास हेच आमचे ध्येय असल्याचे पवार यांनी सांगितले. गरीब समाजाला वर आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शासनाने आणल्या आहेत. या योजना पुढे चालू राहण्यासाठी जनतेने आशीर्वाद व पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.