Vijay Rupani : … तर विजय रुपाणी बचावले असते; पत्नीला ‘त्या’ क्षणाची आयुष्यभर राहणार खंत, सौराष्ट्रात शोककळा

Vijay Rupani : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला अवघ्या काही मिनिटांत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील २४ जणांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण सौराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
विजय रुपाणी हे लंडनला मुलीकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांनी ३ जून रोजी पत्नी अंजली रुपाणी यांच्यासह तिकिटे बुक केली होती, पण पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांमुळे त्यांनी दौरा पुढे ढकलला.
अंजली यांनी त्यांना सोबत लंडनला येण्याचा आग्रह केला होता, पण पक्षाच्या कामाला प्राधान्य देत रुपाणी यांनी १२ जूनची तिकिटे बुक केली. “पत्नीचे ऐकले असते तर प्राण वाचले असते,” अशी खंत अंजली यांना आयुष्यभर राहील. विमानात बसताना एका महिला प्रवाशाने काढलेला त्यांचा फोटो आता व्हायरल झाला आहे.
रुपाणी हे सौराष्ट्रातील प्रभावशाली नेते होते. राजकोट, जुनागड, जामनगर ते कच्छपर्यंत त्यांना साधे, जमिनीशी नाळ जोडलेले मार्गदर्शक मानले जायचे. त्यांच्या निधनाने हजारो कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, DGCA आणि एअर इंडिया प्रशासनाने अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे. विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.





