“प्रबोधनकार ठाकरेंनी ठेवलेले ‘शिवसेना’ हे नाव जर संपवण्यात येत असेल तर..”; छगन भुजबळ यांची भाजपवर टीका

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. निडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आपल्याला खूप दुःख झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच चिन्ह गोठवलं असले तरी शिवसेनेची नवीन निशाणी जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
“चिन्हाचा निर्णय एकवेळ ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव वापरायचं नाही, असा जो निर्णय दिला आहे. ते ऐकून मला वाईट वाटलं. मी अनेक निवडणुका शिवसेना या नावावर लढवल्या आहेत. हे नाव आज राज्यातील खेडोपाड्यात, अनेकांच्या मनात पोहोचलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी हे नाव दिले होते. ते नाव जर संपवण्यात येत असेल तर त्याचे मला दुःख होते आहे”, अशी प्रतक्रिया राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
“मागे वळून बघितलं, तर अनेकदा काँग्रेसचे चिन्हही बदलले आहेत. किंबहूना शिवसेनेत असताना मी सुद्धा काही निवडणुका ढाल-तलवार या चिन्हावर लढवल्या आहेत. आमदार म्हणून मी निवडून आलो, तेव्हा शिवसेनेची निशाणी मशाल होती. मला हे मान्य आहे की, निशाणी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. मात्र, आता सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम अत्याधुनिक झाली आहेत. आता दोन मिनिटांत इथून लंडनपर्यंत निशाणी पोहोचू शकते”, असेही ते म्हणाले.





