पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहे.
भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.