इतिहासाकडून शिकला नाही, तर घटनांची पुनरावृत्ती होते; सिद्धूंचा गर्भित इशारा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावर आता काँग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केंद्र सरकारला गर्भित इशारा दिला आहे.
तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जावून जिंकलेलं नाही, असं इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली.
दिल्ली आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही बघायला मिळाले. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला संयमाने निर्णय घेण्याचं आवाहन केलं. तर दिल्लीतील हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.





