“मुख्यमंत्री पद मिळालं नसतं तर…”; ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंच्या टीकेला मनसैनिकाचे प्रत्युत्तर, भाजपलाही सुनावलं

Sandeep Deshpande : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या राजकीय युतीची वाट पाहिली जात होती. ती अखेर काल २४ डिसेंबरला झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय युतीची घोषणा केली.
त्यांच्या राजकीय युतीमुळे महाराष्ट्रात एक नवे राजकीय समीकरण प्रस्थापित झाले आहे. राज आणि उद्धव यांची गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या भेटी त्यानंतर मराठीच्या मुद्यावर एकत्र येणे आणि आता राजकीय युतीची घोषणा करणे ही अपेक्षित असणारी घडामोड खरी ठरली. ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राज ठाकरेंचे मनसैनिक संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत.” अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा कुठलाही अजेंडा नाही, असेही शिंदे म्हणाले होते. या टीकेवर संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली ती कशासाठी केली? असा सवाल करत सत्तेसाठीच युती केली असे म्हटले. तसेच मुख्यमंत्री पद मिळालं नसतं तर एकनाथ शिंदेंनी युती केली असता का? असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. दुसऱ्याकडे एक बोट दाखवत आहात त्यावेळी चार बोटं त्यांच्याकडे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असा इशारा त्यांनी एकनाथ शिंदेंना दिला.
संदीप देशपांडे यांची भाजपवर टीका
हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही. भारतीय जनता पक्षाने एआयने जनरेट केलेली माकडे आहेत, त्यांची ही माकडे आहेत, त्यांचे हे प्रताप आहेत. भारतीय जनता पक्षाला नॅरेटिव्ह तयार करायचा असून उत्तर भारतीय मत गोळा करायची आहेत. त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत, अशा शब्दांत टीका संदीप देशपांडे यांनी भाजपवर केली.
महायुती जनतेच्या आणि मुंबईच्या विकासासाठी उभी आहे. महायुतीकडे मुंबईसाठी स्पष्ट व्हिजन आहे आणि विकासाचा अजेंडा आहे. आमची युती विकासासाठी असून त्यांची स्वार्थासाठी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले होते. या विधानाचा समाचार संदीप देशपांडे यांनी घेतला. कसली डेव्हलमेंट केली? दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलमेंट होत नाही, जनता खूश असेल तर ती प्रगती असते तो विकास असतो, असे संदीप देशपांडे म्हणाले.
भाजपला सुनावले
संदीप देशपांडे यांनी मुंबईतील रस्त्यावरून पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरले. एक अटल सेतू बांधलाय; पण रस्ते सगळे खड्ड्यात आहेत. रोज उठून मी नाही ना अटल सेतूवर जाणार, जे मुंबईचे रस्ते आहेत. त्यांची काय अवस्था आहे. कचऱ्यात भष्ट्राचार केला असून, याची उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावी लागतील. २० वर्ष सत्तेत होता, हे भारतीय जनता पार्टी विसरली का? असा सवाल करत स्वतः पहारेकरी म्हणत होते ते काय झोपा काढत होते का की डोळे मिटून हात पुढे करत होते एकदा काय ते उत्तर त्यांनी द्यावं, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी भाजपला सुनावले आहे.





