२००८ चे प्रकरण : “मला गुन्हा मान्य नाही”; राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर, नेमकं काय घडलं? अवघ्या काही मनिटातचं…

Raj Thackeray : आज ठाणे येथील कोर्टात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार राज ठाकरे न्यायालयात हजर राहिले. हे २००८ चे प्रकरण असून या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर आज पार पडली. यावेळी कोर्टाने राज ठाकरे यांना एक महिन्याची डेडलाईन दिली आहे. तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल, असे कोर्टाने सांगितले. पण राज यांनी गुन्हा मान्य नसल्याचे कोर्टात उत्तर दिले. त्यामुळे काही मनिटांतच सुनावणी संपली.
कल्याण कोर्टात दाखल झालेला हा खटला २०१९ मध्ये ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हस्तांतरित करण्यात आला असून, राज ठाकरे यांना हजर राहण्याची सन्मस कोर्टाने बजावली होती. अन्यथा अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. या प्रकरणात सात सहआरोपी देखील यावेळी कोर्टात उपस्थित होते. यामध्ये मनसेचे प्रमुख नेते नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आणि नितीन सरदेसाई यांचा समावेश होता.
कोर्टात सुनावणीवेळी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना थेट विचारणा केली की गुन्हा कबुल आहे का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले. मला गुन्हा कबूल नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणी ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी कोर्टात राज ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे २००८ मधील १७ वर्षांपूर्वीचे आंदोलन प्रकरण आहे. त्यावेळी परप्रांतीय रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेने आंदोलन पुकारले होते. आंदोलनावेळी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण झाली होती. तसेच स्टेशनचे नुकसान झाले होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे. उत्तर भारतीयांसाठी रेल्वे भरती मंडळाची परीक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठी तरुणांच्या नोकरीच्या हक्कासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते. तर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : “कुंभमेळा राष्ट्र हितासाठी असला तरी वृक्ष तोडणं अयोग्य, आवश्यक असेल तर…”; अण्णा हजारेंनी स्पष्ट केली भूमिका





