Harshvardhan Patil : “पुढच्या आठ दिवसात, महिन्याभरात मला जर पद मिळालं तर…”; हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेणार?

Harshvardhan Patil : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेले विधान सध्या चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे आगामी काळात पाटील हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पुढच्या आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील जो 10 टक्के वर्ग मला सोडून गेला, तो पटापट माघारी फिरेल असं विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले, काल काय झालं याचा विचार कधीच केला नाही, उद्या काय करायचं ते पाहू. इंदापुरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या विधानाच्या सध्या मोठी चर्चा होत आहे. इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी आपली हाती तुतारी घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांनी भाजपला रामराम केल्यानंतर आणि सलग तिसऱ्यांदा त्यांना पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत असणारे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. याविषयी त्यांनी भाष्य करत सूचक विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
माझ्या कार्यकर्त्यांचे आणि माझं नातं काही पदापुरतं नाही. एक दहा टक्के वर्ग असा आहे जो सोडून गेला. पुढच्या आठ दिवसात, महिन्याभरात मला जर पद मिळालं तर ते पटापटा येतील आपल्याकडे. मग निष्ठावंताना ते बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. पण मी वाटच बघतोय अशी लोक कधी माझ्याकडे परत येणार ते. मला पण राजकारणात चाळीस वर्षे झाली आहेत. परिस्थिती बदलते, चिंता कधीच करायची नाही. काल काय झालंय त्याचा विचार कधीही हर्षवर्धन पाटलाने केला नाही. उद्या काय करायचं ते बघुयात…
मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळणार या आशेवर हर्षवर्धन पाटील होते. मात्र, इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली. यामुळे पाटील नाराज झाले आणि त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटली हेही उपस्थित राहिले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या.





