Chandrakant patil : “फडणवीसांनी डोळे वटारले तर एका दिवसात साम्राज्य उद्ध्वस्त…”; चंद्रकांत पाटील यांचा सतेज पाटलांना सज्जड इशारा
कोल्हापुरात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने आयोजित सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली

Chandrakant patil : गोकुळच्या सत्तासंघर्षात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्षाचा धागा पकडत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर जोरदार निशाणा साधला.
‘मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांच्याकडेच कामे घेऊन जायचे,’ असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांना थेट सुनावले. एवढेच नाही, तर ‘फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल,’ असा आक्रमक इशाराही दिला.
मुख्यमंत्र्यांवर टीका करता आणि त्यांच्याकडेच कामे घेऊन जाता!
कोल्हापुरात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने आयोजित सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणारे सतेज पाटील दुसरीकडे त्यांच्याकडेच कामे घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“एवढी धमक आहे तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊ नका. त्यांच्याकडे कामं घेऊन जाऊ नका. हिंमत आहे ना तुमच्यात? मग राहुल गांधींकडून कामं करून घ्या. मुख्यमंत्र्यांकडे कशाला जाता? ही जमीन द्या, ती जमीन द्या… हे द्या… ते द्या.. मागत राहता आणि लेव्हल सोडून बोलता? अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटलांना सुनावले.
‘फडणवीस तेल लावलेले पैलवान!’
“या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसते डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून मला फक्त आदेश द्यायचा आहे, “फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. भल्या भल्यांनी त्यांना घरी पाठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला; पण ते कुणालाही घाबरत नाहीत,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले.






