इमारत उभी केली मग ‘पार्किंग’चे काय? शिरूर शहरातील पाचकंदील चौकात बेकायदेशीरपणे बांधकाम; भुमीपुत्र प्रतिष्ठान आंदोलन करणार

शिरुरः शिरुर शहरातील नगरपरिषद हद्दीतील पाच कंदिल चौकात बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या बड्या बांधकामधारकावर नगरपरिषद मेहरबान का असा सवाल उपस्थित होत आहे. सदर बांधकामधारकानी इमारत उभी करत असताना कुठल्याही प्रकारची पार्कींगची व्यवस्था केलेली नाही.
तसेच शिरुर नगरपरिषदेकडून घेतलेल्या बांधकाम परवानगीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे, याबाबत वारंवार लेखी तक्रारी प्राप्त होत असताना देखील कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आले असून भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या वतीने सोमवार दि. २४ मार्च पासून नगरपरिषद कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याविषयीची माहिती भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी दिली.
कुठल्याही पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्यातच सदरच्या इमारतीत एक मोठी बॅंक सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर लागत आहेत. स्थानिकांसह अनेकांनी वारंवार नगरपरिषदेकडे पार्किंग संदर्भात तक्रारी केल्या असताना देखील सदर बांधकामावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही. याबाबत मा. जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा यांनी नगरषरिषदेला कार्यवाही करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविले होते.
तरी सदर बांधकामधारकावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. एकप्रकारे नगरपरिषद प्रशासन सदर बांधकामधारकाला पाठीशी घालण्याचे काम करत असून याबाबत सदर बांधकाम धारकाला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे व मंजूर बांधकामाव्यतिरिक्त झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवार दि. २४ मार्च पासून नगरषरिषद कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे .
बँकेच्या पार्किंगमधून गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!
पाच कंदील चौकातील अनधिकृत बांधकाम, त्यामुळे निर्माण होणारी पार्किंगची अडचण, यामुळे तेथील व्यापारी वर्गाचे होणारे हाल या प्रश्नांमुळे श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी आणि मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने या अनाधिकृत बांधकामाविषयी निषेध नोंदवला आहे.
त्यांनी “HDFC बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आवाहन केले होते. तरीही अद्याप शिरुर नगरपरिषदेला जाग आली नसून अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आता लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत. तसेच आमदार माऊली कटके यांनाही याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. .





